आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

Spread the love

पुणे : बेकायदेशीररित्या भारतात येऊन भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड आणि पॅनकार्ड मिळवून कात्रजमध्ये राहत असलेल्या दोन बांगलादेशी बहिणींसह तिघांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. दोघीही बुधवार पेठेत एकमेकींना भेटल्या. मोठ्या बहिणीचा विवाह बिहारमधील व्यक्तीशी झाल्याने तिला १५ वर्षांचा मुलगा आणि १४ वर्षांची मुलगी आहे, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

लीझा मकबुल शेख ऊर्फ खातून तस्लीमा (वय ३०), तिची बहिण रिंकी देवी ऊर्फ खातून तमीना मकबुल मोरल (वय ३८, दोघी रा. सिद्धीविनायक सोसायटी, आंबेगाव) आणि तमीना हिचा पती प्रमोद कुमार चौधरी (वय ४०, मूळ रा. परवलपूर, पर्बलपूर, नालंदा, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयातील पारपत्र विभागाने आंबेगाव पोलिसांना कळविले की खातून तस्लीमा हिने २०२२ मध्ये भारतीय पासपोर्ट मिळवला असून ती वारंवार बांगलादेशात जात आहे. तसेच तिच्या मोबाईलमध्ये अनेक बांगलादेशी क्रमांक आढळले आहेत, म्हणून तिची चौकशी करावी, असे पत्रात नमूद होते.

पोलिसांनी तस्लीमा हिच्या पासपोर्टवरील पत्त्यावर छापा टाकला असता ती तेथे राहत नसल्याचे आढळले. पुढील शोधात ती सिद्धीविनायक सोसायटीत वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. घरझडती दरम्यान तिच्याकडे बांगलादेशी पासपोर्ट तसेच भारतीय आधार कार्ड व पॅनकार्ड सापडले. त्याच ठिकाणी तिची बहिण तमीना मोरल आणि पती प्रमोद कुमार चौधरीही राहत असल्याचे दिसून आले.

अधिक चौकशीत तस्लीमा हिने सांगितले की ती २०१८ मध्ये बांगलादेशी पासपोर्टवर भारतात आली आणि परत न जाता हरीदासपूर येथे राहू लागली. त्यानंतर ती पुण्यात बुधवार पेठेत आली, जिथे २१ वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे भारतात आलेली तिची बहिण तमीना मोरल भेटली.

तमीना २००४ साली बुधवार पेठेत आली होती. तेथे २००६ मध्ये तिची ओळख प्रमोद कुमार चौधरी यांच्याशी झाली आणि लग्न झाले. त्यांना १५ वर्षांचा मुलगा व १४ वर्षांची मुलगी आहे. चौधरी यांच्या मदतीने दोघींनी बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय आधार कार्ड, पॅनकार्ड आणि मतदान ओळखपत्र घेतली.

तब्बल २१ वर्षे भारतात राहिल्यानंतर तमीना व तस्लीमा या बांगलादेशी असल्याचा ठोस पुरावा मिळाल्याने दोघी बहिणींना तसेच चौधरीला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, तसेच पोलिस अंमलदार निलेश जमदाडे, सागर नारगे, प्रमोद भोसले, स्वप्नील शर्मा आणि पूजा खवले यांनी केली.

get_footer();