आवृत्ती पुणे
← Back to Homepage

धाराशिव’ला मिळाली ओळख – ओमराजेंच्या पाठपुराव्याला यश

Spread the love

धाराशिव : धाराशिव जिल्ह्याच्या ऐतिहासिक अस्मितेला न्याय देणारा ऐतिहासिक निर्णय अखेर घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून ‘उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे’ अधिकृत नामांतर करून ‘धाराशिव रेल्वे स्थानक’ असे करण्यात आले असून, या निर्णयामुळे जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

या नामांतरासाठी खासदार ओमप्रकाश (ओमराजे) राजेनिंबाळकर यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न केले. महाराष्ट्र शासनाने पाठवलेल्या प्रस्तावानुसार गृह मंत्रालयाने २ डिसेंबर २०२४ रोजी भारतीय सर्वेक्षण विभागाकडून टिप्पणी मागवली होती.

त्यानंतर काही काळ ही प्रक्रिया संथपणे सुरू होती. परंतु, ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वेळोवेळी बैठक घेतली, तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे ठोस पाठपुरावा केला. त्यांच्या या सक्रिय भूमिकेमुळे केंद्र सरकारने अखेर नामांतरास मंजुरी दिली.

खासदार निंबाळकर म्हणाले, “धाराशिव हे केवळ एक नाव नाही, तर आमच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा भाग आहे. ही पुनर्स्थापना हा आमच्या जिल्ह्याच्या अस्मितेचा विजय आहे.”

या निर्णयामुळे धाराशिव या प्राचीन नगरीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली आहे. अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवर या नावाच्या पुनर्बहालीसाठी जनतेचा आग्रह होता. आता सरकारच्या मान्यतेमुळे जिल्ह्याच्या अस्मितेला अधिकृत आधार मिळाला आहे.

धाराशिव शहर आणि परिसरात नागरिकांनी मोठ्या उत्साहात या निर्णयाचे स्वागत केले. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप आणि मिरवणुका काढून आनंद साजरा करण्यात आला. विविध सामाजिक संस्था, विद्यार्थीवर्ग, इतिहासप्रेमी आणि स्थानिक नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत करत ओमराजेंच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

एनडीए सरकारने गेल्या काही वर्षांत देशभरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थानांची नावे पुनर्स्थापित करत स्थानिक अस्मितेला बळकटी दिली आहे. ‘धाराशिव’चे नावही त्याच पावलावरून चालत जनतेच्या भावना समजून घेत स्वीकारण्यात आले आहे.

धाराशिव रेल्वे स्थानक – केवळ नावबदल नव्हे, तर इतिहासाला मिळालेली सन्मानाची ओळख!

get_footer();