आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पीएमपी बस प्रवासात महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरणारे अटकेत

Spread the love

पुणे : पीएमपी बसमधील प्रवासादरम्यान महिलेच्या हातातील सुमारे एक लाख रुपयांची सोन्याची बांगडी कापून चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सहकारनगर पोलीस ठाणे यांनी अटक केली आहे. आरोपींना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारागृहातून ताब्यात घेऊन पुण्यात आणण्यात आले. त्यांच्या ताब्यातून २ लाख २ हजार रुपयांची सोन्याची बांगडी जप्त करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गोविंद विठ्ठल गायकवाड (वय ३९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) आणि वैभव शैलेश गायकवाड (वय २८, रा. केशवनगर, मुंढवा) अशी आहेत. भोसरी येथील ५० वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी त्या भोसरी बसस्टॉपवरून पीएमपी बसने लोअर इंदिरानगर येथील मैत्रिणीकडे जात होत्या. सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्या बालाजीनगर येथे उतरल्या. बसमधून उतरल्यावर त्यांच्या हातातील १७.५ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस हवालदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ही चोरी गोविंद गायकवाड व त्याच्या साथीदाराने केली आहे. आरोपींचा शोध घेत असताना गोविंद गायकवाड हा मालवण पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटकेत असून ओरस कारागृहात असल्याची माहिती समोर आली.

त्यानुसार तपास पथकाने कारागृहातून दोघांना ताब्यात घेऊन पुण्यात आणले व अटक केली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत चोरीतील सोन्याची बांगडी पोलिसांकडे सुपूर्द केली. ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे व त्यांच्या पथकाने केली.

दोघेही सराईत गुन्हेगार
बसमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील व हातातील दागिने चोरण्यात आरोपी पारंगत आहेत. गोविंद गायकवाड याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी आणि चोरीचे असे एकूण १३ गुन्हे मुंढवा व मालवण पोलीस ठाण्यात दाखल आहेत. वैभव गायकवाड याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी व चोरीचे असे एकूण ४ गुन्हे दाखल आहेत.

get_footer();