आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुणे मर्चंट चेंबरच्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह पॅनेलने मारली बाजी

Spread the love

पुणे : शहरातील प्रतिष्ठेच्या दि. पुना मर्चंट चेंबरच्या 2025-27 या कार्यकाळासाठी झालेली द्विवार्षिक निवडणूक गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी प्रचंड उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभासदांमध्ये यंदाच्या निवडणुकीची विशेष उत्सुकता होती.

या वेळी उत्कर्ष पॅनलकडून पोपटलाल ओसवाल व वालचंद संचेती यांच्या नेतृत्वाखाली १५ उमेदवार रिंगणात उतरले होते, तर प्रोग्रेसिव्ह पॅनलकडून राजेंद्र बाठिया व रायकुमार नहार यांच्या नेतृत्वाखाली १५ उमेदवार रिंगणात होते.

चेंबरला यंदा ७७ वर्षे पूर्ण होत असून, एकूण ५८६ मतदारांपैकी तब्बल ५४४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यातील केवळ ११ मते बाद झाली. सकाळी ९:४५ वाजता सुरुवात झालेल्या मतदानाची प्रक्रिया दुपारी १:४५ वाजेपर्यंत शांततेत आणि सुरळीतरीत्या पार पडली.

निकालांनुसार प्रोग्रेसिव्ह पॅनलचे तब्बल 11 उमेदवार विजयी झाले, तर उत्कर्ष पॅनलला 4 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे प्रोग्रेसिव्ह पॅनलने चेंबरवर आपली भक्कम पकड सिद्ध केली. ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र ते सफल झाले नाहीत.

तरीदेखील संपूर्ण प्रक्रिया उत्साहात व बंधुभावाच्या वातावरणात झाल्याने सभासदांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.

get_footer();