आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुणे विमानतळावर साडेपाच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

Spread the love

पुणे : बँकॉकहून आलेल्या प्रवाशाने खेळण्याच्या बॉक्समध्ये लपविलेला ५ कोटी ४२ लाख रुपयांचा साडेपाच किलो हायड्रोपोनिक गांजा विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने जप्त केला आहे. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातून ११ फेब्रुवारी रोजी बँकॉकहून एक प्रवासी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याच्याकडील सामानाची बारकाईने तपासणी करण्यात आली.

त्याच्याकडील खेळण्याच्या पाच बॉक्समधील पारदर्शक पाकिटांमध्ये कार्बन पेपरमध्ये गुंडाळलेला हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. या अंमली पदार्थाचे वजन ५ किलो ४२९ ग्रॅम असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात ५ कोटी ४२ लाख रुपये इतकी किंमत आहे.

याबाबत आरोपी प्रवाशाला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. हा अंमली पदार्थ कसा आणला व कोणाला देणार होता, याबाबत त्याने माहिती दिली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या ड्रग्ज रॅकेटमागील इतर संबंधितांचा शोध घेतला जात असल्याची माहिती कस्टम विभागाने दिली आहे.

get_footer();