आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्यात गांजा पुरविणाऱ्या दोघांना नंदुरबार, धुळे येथून अटक

Spread the love

पुणे : कदमवाक वस्ती येथे गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पकडून अंमली पदार्थविरोधी पथकाने ३४ किलो गांजा जप्त केला होता. त्यांना गांजा पुरविणाऱ्या दोघांना नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

मंगेश जाण्या पावरा (वय २९, रा. भोगावडे खुर्द, ता. धडगाव, जि. नंदुरबार) आणि ज्ञानेश्वर मगन पावरा (वय २५, रा. मु. पो. सांगवी, ता. शिरपूर, जि. धुळे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कदमवाक वस्ती येथे अक्षय पाडुळे (वय ३१, रा. नवीन म्हाडा कॉलनी, हडपसर) व विशाल जाधव (वय २८, रा. हिंगणे मळा) यांना अटक करून त्यांच्याकडून ६ लाख ८८ हजार ८०० रुपयांचा ३४ किलो ४४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक वाहिद पठाण व त्यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून त्यांना गांजा पुरविणाऱ्यांची माहिती मिळवली.

त्यानुसार पोलीस पथक नंदुरबारकडे रवाना झाले. मंगेश पावरा याला नंदुरबारच्या अतिशय डोंगराळ भागातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या तपासात ज्ञानेश्वर पावरा याची माहिती मिळाली.

ज्ञानेश्वर पावरा याला मुंबई–आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील नवी सांगवी येथून पकडण्यात आले. त्याच्याकडून ९ किलो ४२० ग्रॅम गांजा व होंडा कार जप्त करण्यात आली. या गुन्ह्यात एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण २१ लाख ९१ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये ४३ किलो ७६ ग्रॅम गांजा, दोन कार आणि ५ मोबाईल फोन यांचा समावेश आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, तसेच पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे, रिहान पठाण, अमोल सरडे, निलेश जाधव, विजय कांबळे, मंगेश गुंड, कदम, अक्षय शिर्के आणि शेलार यांनी केली आहे.

get_footer();