आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलीस हवालदार अमोल काटकर यांना मारहाण करणारे तिघे जेरबंद

Spread the love

पुणे : मध्यरात्री कामावरून घरी जात असताना खड्डा चुकवताना गाडीला धक्का लागल्यामुळे पोलीस हवालदार अमोल काटकर यांना त्यांच्या काठीने मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या तिघा आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे.

निखिल प्रविण जगताप (वय २७), सनी संजय खोमणे (वय ३०, रा. म्हसोबा मंदिराजवळ, दत्तवाडी) आणि प्रथमेश ज्ञानेश्वर जाधव (वय २५, रा. दत्तवाडी) अशी या तिघांची नावे आहेत.
पोलीस हवालदार अमोल काटकर (वय ४३, रा. शिवाजीनगर पोलीस वसाहत) हे गुन्हे शाखेच्या युनिट ३ मध्ये कार्यरत आहेत.

ते वारजे येथील युनिट ३ च्या कार्यालयातून रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता निघाले होते. लॉ कॉलेज येथे खड्डा चुकवताना त्यांच्या शेजारून जाणाऱ्या गाडीला धक्का लागला आणि त्यावरील तरुण खाली पडला.

काटकर यांनी गाडी थांबवून त्याला उचलण्यासाठी गेले असता, दुसऱ्या दुचाकीवरील दोघे तेथे आले आणि शाब्दिक वाद झाला. काटकर यांनी आपण पोलीस असल्याचे सांगून, खड्डा चुकवताना चुकून धक्का लागल्याचे स्पष्ट केले.

त्यांनी गाडीला लावलेली काठी काढून दाखवली. मात्र आरोपींनी त्याच काठीने, हाताने आणि लाथाबुक्क्यांनी अमोल काटकर यांच्या कानावर, कपाळावर व पाठीवर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार अमित बोडरे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काटकर यांना मारहाण करणारे आरोपी दत्तवाडी येथे राहतात आणि सध्या घरी आहेत. त्या माहितीनुसार पोलिसांनी त्यांना दत्तवाडीतील म्हसोबा चौक परिसरातील घरातून ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यांना डेक्कन पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे, अमित बोडरे, चेतन शिरोळकर आणि तुषार शिंदे यांनी केली आहे.

get_footer();