आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

Spread the love

पुणे : विद्यार्थ्यांनी भवताल समजून घेत नाविन्यपूर्ण, कलात्मक व शाश्वत विकासाच्या कल्पनांवर काम करावे. प्रकल्प प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलाकौशल्य, सर्जनशीलता आणि संघभावना विकसित होण्यास मोठी मदत होते, असे प्रतिपादन नामवंत आर्किटेक्ट आर्कि. आशिष सचदे यांनी केले.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजी (इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन – पीआयएटी) तर्फे आयोजित ‘ऑरा २०२६’ या सजावट प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हे प्रदर्शन २१व्या वर्षात पदार्पण करत असून यंदा ‘जपानची संस्कृती’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन सादर करण्यात आले आहे.

यावेळी आर्कि. भैरवी सचदे, आर्कि. निलय पारेख, सूर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, ‘पीआयएटी’चे प्राचार्य प्रा. अजित शिंदे, प्रा. मंदार दिवाणे, प्रा. पल्लवी पुरंदरे, प्रा. अनिकेत नायकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आर्कि. आशिष सचदे म्हणाले की, “जपानी संस्कृती, भारत-जपान मैत्रीचे प्रतीक असलेले ओकायामा उद्यान, तसेच विविध आकर्षक व कलात्मक डिझाईन्स विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने सादर केल्या आहेत.

भवतालातील टाकाऊ वस्तूंमधून कलाकृती उभारून केलेले हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे उत्तम उदाहरण आहे.” आर्कि. भैरवी सचदे यांनी विद्यार्थ्यांनी पर्यावरण, समाज आणि शाश्वत विकास यांचा विचार करून नाविन्यपूर्ण कल्पनांवर काम करण्याचे आवाहन केले.

तर आर्कि. निलय पारेख यांनी विद्यार्थ्यांनी चाकोरीबाहेरचा विचार करून नाविन्यपूर्ण संरचना व कलात्मकतेचा अंगीकार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रदर्शनात जपानी शैलीवर आधारित विविध आकर्षक रचना, फुलांची सजावट, सुमो प्रतिकृती, संतुलित रंगसंगती, थ्रीडी मांडणी आणि डिझाईन शीट्स यांचे सादरीकरण करण्यात आले आहे.

तसेच रेसिडेन्शियल इंटिरिअर, कमर्शिअल इंटिरिअर, सिंगल लाईन प्लॅनिंगपासून फर्निचर डिझाईनपर्यंतची मांडणी, हॉस्पिटल डिझाईन, रेस्टॉरंट डिझाईन, शोरूम व विविध प्रकारच्या गॅलरी डिझाईन्स यांचा समावेश प्रदर्शनात करण्यात आला आहे.

टिळक रस्त्यावरील अभिनव महाविद्यालयाशेजारी निखिल प्राईड इमारतीत असलेल्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजीमध्ये हे प्रदर्शन १ मार्चपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विनामूल्य खुले असणार आहे.

यावेळी जपानी शिष्टमंडळानेही प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले. प्राचार्य प्रा. अजित शिंदे यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, “दरवर्षी या प्रदर्शनासाठी वेगळी व नाविन्यपूर्ण संकल्पना निवडली जाते.

यंदा जपानी संस्कृतीवर आधारित प्रदर्शन विद्यार्थ्यांनी एकजुटीने साकारले आहे. यामुळे भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.” प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन प्रा. पल्लवी पुरंदरे आणि प्रा. अनिकेत नायकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

get_footer();