आवृत्ती पुणे
← Back to Homepage

फटाका सायलेंसरवर रोड रोलर फिरवून केले नष्ट

Spread the love

पुणे : फटाका सायलेंसर बसवून लोकांना कानठळ्या बसविणारा आवाज करत जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर वारजे माळवाडी पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा १५ बुलेट गाड्या जप्त करून गॅरेज चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलेटला फटाका सायलेंसर बसवून मोठा आवाज करत जाणाऱ्या तरुणांबाबत अनेक तक्रारी येत होत्या. सोशल मीडियावरही त्यांच्या या कृत्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. हे लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी अशा दुचाकीस्वारांवर कारवाईचे आदेश दिले. तपास पथकाने वारजे, कर्वेनगर, शिवणे भागात पेट्रोलिंग केले. त्यादरम्यान मॉडिफाय केलेले व फटाके वाजविणारे सायलेंसर लावून शांततेचा भंग करणाऱ्या १५ बुलेट दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. दुचाकींचे सायलेंसर जप्त करण्यात आले.

या दुचाकीस्वारांकडे केलेल्या चौकशीत हे मॉडिफाय केलेले सायलेंसर वारजे येथील ‘रॉयल बाईक सर्व्हिस’ या गॅरेजमधून बसविले असल्याचे समोर आले. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांनी या गॅरेजमध्ये जाऊन चौकशी केली असता, गॅरेजचे मालक योगेश दामोदर सपकाळ (वय ३३, रा. ओप्युलन्स बिल्डिंग, झील कॉलेज चौक, नर्‍हे) हा बुलेट मोटारसायकलींना मॉडिफाय केलेले व फटाके वाजविणारे सायलेंसर बसविताना आढळून आला. त्याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरएमडी कॉलेजसमोर जप्त केलेल्या मॉडिफाय सायलेंसरवर रोड रोलर चालवून त्यांचा चकनाचूर करण्यात आला. यावेळी असंख्य महाविद्यालयीन तरुणांना असे सायलेंसर बसविल्यास काय कारवाई होते, हे दाखवून देत त्यांचे समुपदेशन करण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.


get_footer();