आवृत्ती पुणे
← Back to Homepage

फसवणूक करणार्‍या किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल

Spread the love

पुणे : रिलायन्स मॉल बंद होत असल्याचे सांगून कमी दरात किराणा माल खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत एका किराणा व्यापाऱ्याने १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत उमा प्रल्हाद जाधवर (वय ३५, रा. आर्यनगर, विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राकेश रमणलाल पारख (रा. दीप हायट्स, रामवाडीनगर रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश पारख हे फिर्यादींच्या लहानपणापासून ओळखीचे आहेत. फिर्यादींचे फळांचे दुकान असून राकेश पारख यांचे किराणा दुकान आहे. ओळखीचा फायदा घेत पारख यांनी किराणा मालाचा व्यापार वाढवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगितले.

व्यवसायातील नफ्यातून ठराविक हिस्सा देण्याचे आश्वासन देत त्यांनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले. त्यानंतर “एक रिलायन्स मॉल बंद होत असून तेथील माल कमी दरात खरेदी करण्याची संधी आहे,” असे सांगून अधिक रक्कम उभी करण्यास सांगितले.

जानेवारी ते मे आणि सप्टेंबर २०२४ या कालावधीत फिर्यादींनी एकूण १० लाख ४५ हजार रुपये दिले. त्यापैकी १ लाख ९५ हजार रुपये परत मिळाले, मात्र उर्वरित ८ लाख ५० हजार रुपये परत करण्यात आले नाहीत.

फिर्यादींच्या नातेवाईक विनोद दरांडे यांनी ३ लाख ५० हजार रुपये, तर दत्ता खाडे यांनी ७ लाख रुपये दिले. अशा प्रकारे किराणा व्यापार आणि रिलायन्स मॉलमधील माल खरेदीच्या नावाखाली एकूण १९ लाख रुपये घेण्यात आले.

पैशांची मागणी केल्यानंतर राकेश पारख यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच “मी स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करीन आणि तुमचे नाव त्यात गोवेन,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करत आहेत.

get_footer();