आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भर चौकात मित्रावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न

Spread the love

पुणे : मित्राच्या सांगण्यावरून मैत्रिणीने आपल्याबरोबरचे प्रेमसंबंध तोडून विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या समजातून तरुणाने मित्रावर भर चौकात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेत आदित्य सुनील कांबळे (वय २०, रा. एस. के. रेसिडेन्सी, नवले पुलाजवळ, नऱ्हे) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी चेतन बाजीराव चव्हाण (वय २३, रा. समर्थ कॉम्प्लेक्स, धनकवडी) याला अटक केली आहे.

ही घटना धनकवडीतील संजीवनी बार, त्रिमूर्ती चौक येथे तसेच समोर असलेल्या ऊसाच्या गुऱ्हाळाच्या आतील गल्लीत २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण हे मित्र आहेत.

चेतन चव्हाण याच्यावर त्याच्या मैत्रिणीने विनयभंगाची फिर्याद दिली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात चेतन चव्हाण याच्यावर नोव्हेंबर २०२५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण हे संजीवनी बारमध्ये दारू पिण्यास बसले होते.

त्यावेळी चेतन याने आदित्यला, “तुझ्या सांगण्यावरून माझ्या मैत्रिणीने माझ्याशी मैत्री तोडून माझ्यावर गुन्हा दाखल केला,” असे म्हटले. त्यावर आदित्य याने, “असे काही नाही. मी तिला काही सांगितले नाही. थांब, तिला फोन लावून विचारतो,” असे म्हणून त्या मैत्रिणीला फोन लावून स्पीकरवर ठेवला.

आदित्य याने तिला विचारले, “मी तुला गुन्हा दाखल करायला सांगितले का?” त्यावेळी तिला माहिती नव्हते की चेतन तेथेच बसला असून तो सर्व ऐकत आहे. तिने, “त्याचे नाव कशाला घेतोस?” असे म्हणून त्याच्याविषयी वाईट शब्द वापरले. ते ऐकून चेतन चव्हाण याला राग आला आणि तो आदित्यला मारायला धावला.

घाबरून आदित्य बारमधून बाहेर पडून धावू लागला. चेतन याने त्याचा पाठलाग केला. त्याने ऊसाच्या गुऱ्हाळातील कोयता घेऊन भर चौकात आदित्यला गाठले. आदित्य खाली पडला असताना चेतन याने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या आदित्य याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भारती विद्यापीठ पोलिसांनी सुरुवातीला दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केला. चेतन आदित्यवर कोयत्याने वार करत असताना जमलेल्या गर्दीतील काही लोकांनी त्याचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ बुधवारी दिवसभर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न हे कलम वाढवून चेतन चव्हाण याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते तपास करत आहेत.

get_footer();