आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भर रस्त्यात महिला पोलीस अधिकार्‍याचा विनयभंग

Spread the love

पुणे : महापालिकेतील महिला अधिकार्‍यांना जाणीवपूर्वक त्रास दिल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका पदाधिकार्‍यावर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच, आता महिला पोलीस अधिकाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या भाजपच्या शहर महामंत्री प्रमोद कोंढरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दौर्‍याच्या दरम्यान, शनिवारवाडा समोरील एका चहाच्या दुकानासमोर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता शनिवारवाडा येथे भुयारी मार्ग प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी येणार होते.

त्यामुळे भाजपचे आमदार हेमंत रासने यांच्यासह अनेक पदाधिकारी तेथे उपस्थित होते. अचानक पाऊस येऊ लागल्याने सर्वजण जवळच असलेल्या ‘अभिनंदन कडक चहा’ येथे गेले. यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठीमागे जाणीवपूर्वक उभे राहून प्रमोद कोंढरे यांनी अत्यंत घृणास्पद कृत्य केले.

त्याचे वर्तन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे होते. या महिला अधिकाऱ्यांनी त्याला जाब विचारल्यानंतरही त्याने त्यांच्या समोर अरेरावीचे वर्तन केले. या प्रकारामुळे लज्जित झालेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना ही माहिती दिली.

यानंतर रात्री उशिरा फरासखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रमोद कोंढरे यांनी पत्रक काढून हा प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचे म्हटले आहे.

प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध यापूर्वी खडक, विश्रामबाग आणि डेक्कन पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करत आहेत.

get_footer();