आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भूम ते आरसोली रस्त्याची दयनीय अवस्था

Spread the love

भूम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या भूम ते आरसोली रस्त्याची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यामुळे दिनांक १७ एप्रिल रोजी आरसोली येथील ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दहा दिवसांत लेखी आश्वासन देऊन रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी केली होती. मात्र अद्याप कोणतीही लेखी माहिती ग्रामस्थांना मिळालेली नाही.

ग्रामपंचायतपासून जिल्हा स्तरापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेली उदासीन भूमिका प्रशासनाच्या पथ्यावर पडत असून, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी महाराष्ट्र दिनी (१ मे) सामूहिक आत्मदहन आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

भूम तालुक्यातील भूम ते आरसोली – देवळाली – तांबेवाडी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ साली या रस्त्याचे उद्घाटन केले होते.

उद्घाटनावेळी त्यांनी ठेकेदाराला रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचा इशारा दिला होता. मात्र, ना मुख्यमंत्री परत आले ना रस्ता सुस्थितीत राहिला. रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पाच वर्षांसाठी लोकमंगल समूहाकडे होती.

परंतु देखभाल नीट न झाल्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. नागरिक मोठ्या प्रमाणावर या मार्गाचा वापर करत असत, मात्र रस्ता खराब झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

आरसोली गावातील नागरिकांनी वारंवार दुरुस्तीची मागणी केली असतानाही प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. माजी आमदार व सरपंच सत्तेअभावी असहाय असल्याचे सांगतात, तर विद्यमान आमदार मंत्री पदावर नाराज असल्यामुळे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जाते.

पावसाळा जवळ येत असताना या रस्त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो, तरीही प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे, असा नागरिकांचा आरोप आहे. आता महाराष्ट्र दिनी होणाऱ्या आत्मदहन आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

get_footer();