आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मर्सिडीज कार नवले पुलावरून सर्व्हिस रोडवर कोसळली

Spread the love

पुणे : नवले पुलावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या मर्सिडीज कारने पुलाचे कठडे तोडले आणि थेट खालील सर्व्हिस रोडवर कोसळली. याच वेळी त्या रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकीवर ही कार आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी जागीच ठार झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. वैद्यकीय चाचणीत मर्सिडीज कारचालक मद्यधुंद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अपघातात मृत्यू पावलेल्याचे नाव कुणाल मनोज हुशार (वय २३, रा. चिंचवड) आहे. तर गंभीर जखमी प्रज्योत दीपक पुजारी (वय २१, रा. चिंचवड) यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघातानंतर मर्सिडीज कारमधील चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

निखिल मिलिंद रानावडे (वय २६, रा. औंध गाव), श्रेयस रामकृष्ण सोळंखी (वय २५, रा. चिंचवड), वेदांत इंद्र सिंग राजपूत (वय २८, रा. निगडी) आणि चालक शुभम राजेंद्र भोसले (वय २७, रा. निगडी) अशी अटक झालेल्या चार तरुणांची नावे आहेत.

शुभम भोसले यानेच मर्सिडीज चालवली असून, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौघांची मर्सिडीज (MH 01 BK 4625) कात्रजकडून पिंपरी चिंचवडकडे भरधाव वेगाने जात होती.

पहाटे साडेतीनच्या सुमारास गाडीचा वेग आणि चालकाने केलेले मद्यप्राशन यामुळे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी नवले पुलावरील बॅरिकेड तोडून खाली सर्व्हिस रोडवर कोसळली. नेमक्याच वेळी स्प्लेंडर दुचाकीवरून (MH 12 VH 4340) प्रज्योत पुजारी व कुणाल हुशार जात होते.

कार थेट त्यांच्या दुचाकीवर आदळली. या धडकेत कुणाल हुशार यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रज्योत पुजारी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमधील एअरबॅग्स उघडल्यामुळे चौघेही किरकोळ जखमी झाले.

मात्र या अपघातासाठी जबाबदार असलेल्या चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

get_footer();