आवृत्ती पुणे
← Back to Homepage

येरवडा पोलीस ठाण्याच्या कोठडीतून आरोपीचे पलायन

Spread the love

पुणे : अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या प्रकरणात अटक केलेला आरोपी येरवडा पोलीस ठाण्यातील बाथरुममधील खिडकीच्या काचा काढून पळून गेला. येरवडा पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेऊन त्याला रात्री उशिरा पुन्हा पकडले.

शैलेश राजू मोहिते (वय १९, रा. कामराजनगर, नुराणी मशीरमागे, येरवडा) असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश मोहिते याने एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते.

मुलीच्या आईच्या तक्रारीवरून येरवडा पोलिसांनी शैलेश मोहिते याचा शोध घेऊन त्याला ५ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील कोठडीत असताना, ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास त्याने चादर घेण्याचा बहाणा केला.

तो स्वच्छतागृहातील बंद असलेल्या बाथरुममध्ये गेला. त्या बाथरुमच्या खिडकीच्या काचा काढून तो पळून गेला. काही वेळानंतर ही बाब लक्षात आली. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार आरोपीचा शोध घेऊ लागले. रात्री उशिरा त्याला लक्ष्मीनगर येथे पुन्हा पकडण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक फटांगरे तपास करत आहेत.

get_footer();