आवृत्ती पुणे
← Back to Homepage

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

पुणे : फ्लॅट आणि गोडाऊन देण्याबाबत नोटरी करार करून प्रत्यक्ष ताबा न देता एका महिलेची ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या नगरसेवकाच्या भावाविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुसेन अहमद पठाण (वय ५०, रा. दत्तवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हाजी अब्दुल गफुर पठाण यांचे ते भाऊ आहेत. याबाबत अश्विनी दिलीप सारंदा (वय ३१, रा. गणेश पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेन पठाण यांची अम्मार डेव्हलपर्स अँड बिल्डर्स ही फर्म आहे. गणेश पेठेतील अमान प्लाझा या इमारतीत एक फ्लॅट ३८ लाख ४० हजार रुपये आणि गोडाऊन २१ लाख ८५ हजार रुपयांमध्ये देण्याचे ठरले होते.

एकूण ६० लाख २५ हजार रुपयांमध्ये देण्याचे ठरले होते. त्यासाठी २०१६ मध्ये करारनामा करण्यात आला होता. याशिवाय इलेक्ट्रिक कनेक्शन, मीटर, सोसायटी फॉर्मेशन चार्जेस, वकील फी इत्यादी खर्चापोटी २ लाख रुपये देण्याची अट होती. २० टक्के रक्कम त्यांनी भरायची व ८० टक्के रक्कम कर्जाने घेऊन द्यायची ठरले होते.

त्याप्रमाणे पठाण यांनी मागणी केल्यानुसार त्यांनी पैसे दिले. असे असतानाही त्याने खरेदीखत केले नाही. त्या कर्जाचे हप्ते ते भरत होते. बिल्डरकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कर्जाचे हप्ते भरणे बंद केले. बिल्डरकडे खरेदीखतासाठी फ्लॅट व गोडाऊनचा ताबा मिळावा यासाठी ते पाठपुरावा करत होते; मात्र तो टाळाटाळ करत होता.

त्यानंतर त्यांना समजले की त्यांना विकण्यात आलेल्या फ्लॅटची टॅक्स पावती बिल्डरने स्वतःच्या नावावर पुणे मनपाकडून करून घेतली आहे. २०१६ मध्ये नोटरी करार करूनही २०२४ पर्यंत ताबा न दिल्याने त्यांनी अखेर न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर खडक पोलिसांनी हुसेन पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करत आहेत.

get_footer();