आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रेझिंग डे निमित्त बार्शी शहर पोलीस स्टेशनतर्फे जनजागृती कार्यक्रम

Spread the love

बार्शी : सेवा, शौर्य, समर्पण व विश्वास या ब्रीदवाक्याअंतर्गत महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे.

या निमित्ताने दिनांक ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी २०२६ या कालावधीत नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांच्या प्रारंभी दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी साधना कन्या प्रशाला, बार्शी येथील विद्यार्थिनींना बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे बोलावण्यात आले होते.

यावेळी शाळेतील एकूण ८० विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना पोलीस दलाकडील पिस्तूल, बाराबोर छरा बंदूक, एस.एल.आर., कार्बाईनस्टेन गन, फायबर काठी, ढाल, हेल्मेट, अश्रुधूर कांड्या तसेच हातकडी या सर्व शस्त्रांची माहिती प्रत्यक्षरित्या दिली. विद्यार्थिनींनी या सर्व साधनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

तसेच त्यांनी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वापरात असलेल्या विविध वाहनांची माहिती, डायल ११२ आपत्कालीन वाहनाचे कार्य, शहरातील विविध भागांतील पेट्रोलिंग व्यवस्था, तसेच निर्भया पथकाअंतर्गत महिलांच्या सुरक्षिततेसाठी व शाळांमध्ये जनजागृतीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांबाबत थोडक्यात माहिती दिली.

यावेळी विद्यार्थिनींनी पोलीस स्टेशनमधील कारागृह (जेल) सर्वाधिक आवडल्याचे सांगितले. यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप यांनी विद्यार्थिनींना पोलीस स्टेशनच्या दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती दिली.

यामध्ये डी.बी. कक्ष, गोपनीय कक्ष, सेशन पथक, निर्भया पथक, महिला संरक्षण कक्ष, वायरलेस रूम, मुद्देमाल कक्ष, पुरुष आरोपी लॉकप व महिला आरोपी लॉकप, सायबर कार्यालय, वाहतूक कार्यालय तसेच अर्ज शाखा या विविध विभागांचे कार्य समजावून सांगण्यात आले. तसेच त्यांनी पोस्को कायदा, महिलांची व मुलींची छेडछाड, बाल लैंगिक अत्याचार यासंदर्भात विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

दरम्यान सायबर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष जाधवर यांनी विद्यार्थिनींना सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत सूचना देत अठरा वर्षांखालील मुलींनी इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप व फेसबुक अकाउंटचा वापर करू नये, तसेच सोशल मीडियावरील गैरवापराची माहिती पोलीस यंत्रणेकडे उपलब्ध असते, असे स्पष्ट केले. विद्यार्थिनींनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

हा संपूर्ण कार्यक्रम सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसेच बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक धनप्पा शेटे, सहाय्यक पोलीस फौजदार अजित वरपे, महिला सहाय्यक पोलीस फौजदार सिंधू देशमुख, गोपनीय कक्षाचे पोकॉ कादर तांबोळी, सायबर शाखेचे पोकॉ संतोष जाधवर, पोकॉ सचिन देशमुख, राहुल उदार, अवि पवार, बाळकृष्ण मुठाळ, महिला पोकॉ श्वेता गुंड यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच साधना कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका विनिता काळे, सहशिक्षक दीपक दुधनकर, शिक्षिका महानंदा पाटील तसेच शाळेचे सेवक गणेश सावंत यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

get_footer();