आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लिफ्टच्या बहाण्याने तरुणाला मारहाण करून लुबाडले

Spread the love

पुणे : पुणे स्टेशनला सोडण्याचा बहाणा करून कारचालक व त्याच्या साथीदारांनी तरुणाचे अपहरण करून बंडगार्डन परिसरात फिरवून मारहाण केली. या तरुणाकडून जबरदस्तीने गुगल पेचा पासवर्ड घेऊन ऑनलाईन पैसे लुबाडल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत प्रेमजी लालेंग पाटीदार (वय ४२, रा. नरपतगिरी चौक, सोमवार पेठ) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार नगर रोडवरील शास्त्रीनगर चौक, बंडगार्डन रोड, इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर, कोरेगाव पार्क परिसरात ३० जानेवारी रोजी रात्री दहा ते ३१ जानेवारी पहाटे अडीच वाजेपर्यंत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटीदार हे पुणे स्टेशनला जाण्यासाठी शनिवारी रात्री गाडीची वाट पाहत होते.

त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून चौघे जण त्यांच्याजवळ आले. लिफ्ट देण्याचा बहाणा करून त्यांनी त्यांना कारमध्ये बसवले. त्यानंतर त्यांचे अपहरण करून बंडगार्डन रोड व कोरेगाव पार्क परिसरात बराच वेळ फिरवले.

त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करून दुखापत केली. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांचा मोबाईल जबरदस्तीने घेऊन त्यातील गुगल पेचा पिन मिळवून त्यांच्या खात्यातून १८ हजार ८०० रुपये ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर त्यांना वाटेत सोडून देऊन आरोपी पळून गेले. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक नंदनवार करीत आहेत.

get_footer();