आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार

Spread the love

पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि.२०) सायंकाळी करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून बुधवारी लोकार्पण झाल्यानंतर रहदारीसाठी हा उड्डाणपुल खुला करण्यात येईल. परिणामी वाहनधारकांसह नागरिकांना या भागातून प्रवास करणे सुकर होणार असल्याची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.

पुणे विद्यापीठ चौकामध्ये तसेच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दिर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून यासाठी अंदाजित रु.२७७ कोटीच्या अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त आहे.

या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच अस्तित्वातील वाहतुकीस पुरेसा रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून गणेशखिंड रस्त्याचे पुणे विद्यापीठ ते भारतीय कृषी महाविद्यालय (RBI) या लांबीमध्ये पुणे मनपा विकास आराखड्यानुसार ४५ मी. पर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे.

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर या उड्डाणपुलाची एक मार्गिका (औंध – शिवाजीनगर) वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित बाणेर व पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सांग‍ितले.

get_footer();