आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

Spread the love

पुणे : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमाला सदिच्छा भेट देत, अनाथ व निराधार लहान मुलांप्रती सामाजिक बांधिलकीची जाणीव कृतीतून अधोरेखित केली. विद्यार्थ्यांनी मुलांशी संवाद साधत त्यांच्यात मिसळून विविध उपक्रम राबवले.

ही संस्था विशेषतः सहा वर्षांपर्यंतच्या अनाथ व निराधार बालकांची देखभाल करते. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी मुलांशी स्नेहपूर्वक संवाद साधला, त्यांच्या आनंदात सहभागी होत विविध खेळ, गाणी, गोष्टी यांचा आनंद घेतला.

विद्यार्थ्यांनी मुलांसाठी कपडे, डायपर्स, औषधे व इतर अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. या भेटीमुळे केवळ सद्भावनेचा अनुभव नव्हे, तर समाजप्रती जबाबदारी आणि सेवा भावनेची प्रचिती विद्यार्थ्यांना आली.

या प्रसंगी पवन आमटी आणि अमिषा देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत आपल्या भावना अत्यंत संवेदनशीलपणे व्यक्त केल्या. त्यांच्या बोलण्यातून वातावरण भावनांनी भारावून गेले. विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून व्यवस्थापन, मुलांची दिनचर्या व येणाऱ्या अडचणी याबाबत माहिती घेतली.

संस्थेतील सेवकांना मानसिक व भावनिक अडचणींना सामोरे जात असताना जाणवणाऱ्या निःस्वार्थ सेवाभावाचे अनुभव विद्यार्थ्यांसाठी शिकण्यासारखे ठरले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहवेदना, करुणा आणि सामाजिक जाणिवेचा विकास झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. उपक्रमाचे नियोजन प्रा. मुकेश मोहिते आणि डॉ. अभय शिंदे यांनी केले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे, तर भावनिक व सामाजिक दृष्टिकोनातूनही समृद्ध होतात, असे मत प्राध्यापकांनी व्यक्त केले.

get_footer();