आवृत्ती पुणे
← Back to Homepage

व्याज देण्यासाठी जबरदस्तीने फ्लॅटचा सावकारांनी घेतला ताबा

Spread the love

पुणे : व्यवसायासाठी ३ लाख रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर व्याजासह एकूण ४ लाख ८० हजार रुपये परत करूनही आणखी ८ लाख रुपयांची मागणी करत फ्लॅटचा ताबा जबरदस्तीने घेणाऱ्या महिलेसह दोघा सावकारांवर वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वारजेमधील ३६ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यावरून विशाल लंकेश्वर आणि मधुमती रंगदाळ (रा. वारजे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कर्वेनगर येथे ‘पुरंदरे स्नॅक्स व भोजनालय’ नावाचा हॉटेल व्यवसाय होता.

त्यांना हॉटेल डेव्हलप करायचे असल्याने २०२२ मध्ये विशाल लंकेश्वर याने मधुमती रंगदाळ यांच्या नावाने त्यांना ९ हजार रुपये कर्ज दिले. फिर्यादी यांनी डेली कलेक्शनप्रमाणे दररोज २५० रुपये या दराने ५० दिवसांत एकूण १२ हजार ५०० रुपये परत केले होते.

त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये त्यांनी विशाल लंकेश्वर याच्याकडून ३ लाख रुपये घेतले. डिसेंबर ते ऑगस्ट २०२४ या २० महिन्यांच्या कालावधीत विशाल लंकेश्वर यांच्या सांगण्यावरून मधुमती रंगदाळ यांना ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात ४ लाख ८० हजार रुपये व्याजासह परत केले.

तरीही फेब्रुवारी २०२५ मध्ये विशाल याने त्यांच्याकडे आणखी १ लाख रुपयांची मागणी केली. त्यावर फिर्यादी यांनी “सर्व पैसे दिले आहेत, आता कसले पैसे द्यायचे?” असे विचारले असता विशाल लंकेश्वर याने “१ लाख रुपये दिले नाहीत तर तुला बघून घेतो” अशी धमकी दिली.

त्यानंतर काही दिवसांनी फिर्यादी व त्यांची पत्नी वारजे येथील सुरभी हाईट्स येथील फ्लॅट खाली असल्याने साफसफाईसाठी गेले असता तेथे विशाल लंकेश्वर आणि मधुमती रंगदाळ आले. त्यांनी पैशांची मागणी केली.

“रूम विकल्यावर पैसे देतो,” असे फिर्यादी यांनी सांगितले असता “फ्लॅटची विक्री होईपर्यंत तो आमच्या ताब्यात राहील,” असे म्हणून त्यांनी जबरदस्तीने रूमचा ताबा घेत त्यांना हाकलून दिले.

फिर्यादी यांनी हा फ्लॅट विकल्यानंतर चावी घेण्यासाठी ते विशाल लंकेश्वर व मधुमती रंगदाळ यांच्याकडे गेले असता “ऑगस्ट २०२४ पासून आतापर्यंतचे व्याज ३ लाख रुपये आणि मुद्दल ५ लाख रुपये द्या, मगच फ्लॅट खाली करू,” असे म्हणत त्यांनी बेकायदेशीरपणे फ्लॅटचा ताबा स्वतःकडेच ठेवला.

यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे करीत आहेत.

get_footer();