आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल, काडतूस जप्त

Spread the love

पुणे : खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी रात्रभर सापळा रचून सराईत गुन्हेगाराला पकडले व त्याच्याकडून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे.

संकेत गोरख चोरघे (वय २३, रा. साई सिद्धी अपार्टमेंट, आंबेगाव पठार; मूळ रा. कोलवडी, ता. वेल्हा) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. संकेत चोरघे हा सराईत गुन्हेगार असून त्याला पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने २०२४ मध्ये पिस्टलसह अटक केली होती.

याबाबत राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तो भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. खंडणी विरोधी पथक पाहिजे आरोपी व तडीपार गुन्हेगारांची तपासणी करत असताना पोलीस हवालदार सचिन माळवे व पोलीस अंमलदार दयानंद तेलंगे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार संकेत चोरघे याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली.

खंडणी विरोधी पथकाने संकेत चोरघे याच्याबाबत माहिती घेतली असता तो आंबेगाव पठार येथील साई सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहत असून त्याचे आंबेगाव पठार, तुकाई दर्शन व सिंहगड कॉलेज परिसरात येणे-जाणे असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी खंडणी विरोधी पथकाला संकेत चोरघे हा सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये आल्याची माहिती मिळाली. पोलीस पथक तेथे गेले असता संकेत चोरघे हा दुचाकीवरून पळून गेला. त्यानंतर खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदारांनी तो राहत असलेल्या आंबेगाव पठार येथे रात्रभर सापळा रचला.

२५ फेब्रुवारी रोजी तो घरी आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे ३५ हजार २०० रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल व त्याच्या मॅगेझिनमध्ये १ जिवंत काडतूस आढळून आले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करून अधिक तपासासाठी त्याला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार सचिन माळवे, दयानंद तेलंगे, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, नितीन कांबळे, गितांजली जांभुळकर, रहिम शेख व अमोल आवाड यांनी केली.

get_footer();