आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सिमेंट बंधाऱ्याच्या कामाच्या बिलासाठी लाच घेणारी ग्रामसेविका जाळ्यात

Spread the love

पुणे : सिमेंट बंधाऱ्याच्या कामाच्या बिलासाठी आधीच ३० हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर उर्वरित बिल काढण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बारामती तालुक्यातील पळशी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

ग्रामसेविका कांता बापूराव काळाणे (वय ५७) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत एका ४३ वर्षांच्या ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी बारामती तालुक्यातील पळशी गावाच्या हद्दीत एका पाणीसाठवण सिमेंट बंधाऱ्याचे काम केले होते. या कामाचे बिल १६ लाख ४६ हजार रुपये झाले होते. हे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामसेविका कांता काळाणे यांनी तक्रारदाराकडे बिलाच्या रकमेच्या ४ टक्के प्रमाणे ६० हजार रुपयांची लाच मागितली होती.

कांता काळाणे यांनी त्या कामाच्या बिलाचा १४ लाख ९६ हजार रुपयांचा पहिला चेक देताना मागितलेल्या ६० हजार रुपयांपैकी ३० हजार रुपये तक्रारदाराकडून रोख स्वरूपात घेतले होते. तक्रारदाराने केलेल्या कामाचे उर्वरित १ लाख ५० हजार रुपयांचे बिल काढण्यासाठी ग्रामसेविका उर्वरित ३० हजार रुपयांची लाच वारंवार मागत असल्याची तक्रार ६ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने ७ मे रोजी पडताळणी केली असता, तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारण्याचे ग्रामसेविकेने मान्य केले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पळशी ग्रामपंचायतीत सापळा रचला.

तक्रारदाराकडून २५ हजार रुपये स्वीकारताना कांता काळाणे यांना रंगेहात पकडण्यात आले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल भोसले अधिक करत आहेत.

get_footer();