आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

Spread the love

पुणे : हळदीच्या पाकिटात लपवून गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना बाणेर पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ३ किलो गांजा जप्त केला. तसेच चिंचवडमधील चाफेकर चौक येथील त्यांच्या घराच्या झडतीत १३ किलो गांजा जप्त करण्यात आला.

अभिषेक भिका बोरसे (वय २४) आणि अक्षय भिका बोरसे (वय २९, दोघे रा. चाफेकर चौक, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार गणेश गायकवाड यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर, कैलास दाबेराव, पोलीस हवालदार संदेश निकाळजे, गणेश गायकवाड, पोलीस अंमलदार स्वप्नील मराठे, शरद राऊत यांना कार्यालयात बोलावून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाने ज्युपिटर हॉस्पिटल परिसरात तपासणी सुरू केली. त्यावेळी जलतरण तलावाच्या मागील रस्त्यावर दुचाकीवर दोघे जण ग्राहकाची वाट पाहत थांबलेले दिसले. पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्या सॅकची झडती घेतली असता त्यात हळद पावडरची पिशवी आढळली. या पिशवीचा वास घेतला असता गांजासारखा वास येत होता.

पोलिसांनी त्यांच्याकडून २ किलो ९७० ग्रॅम गांजा, थायलंड व सिंगापूरच्या चलनी नोटा, मोबाईल, दुचाकी असा एकूण २ लाख २० हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर चिंचवडमधील चाफेकर चौकातील भाड्याच्या घराची झडती घेतली असता आणखी १३ किलो गांजा आढळून आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत आणि पोलीस निरीक्षक अलका सरग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर तपास करत आहेत.

get_footer();