आवृत्ती पुणे
← Back to Homepage

१५ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला ‘चरणसेवा शिबीराचा’ लाभ

Spread the love

पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘चरणसेवा शिबीर’ या उपक्रमाचा सुमारे १५ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी लाभ घेतला.

पुणे शहरातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या पुढाकाराने पारगे चौक, कसबा गणपती, कस्तुरी चौक, नानापेठ, रामोशी गेट, सह्याद्री मैदान, गंगाधाम रोड, काशेवाडी, मार्केटयार्ड आणि गंगाधाम चौक या १० ठिकाणी हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिरांमध्ये १ हजार ३७ विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी सेवा बजावली.

‘वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा’ या भावनेतून डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, संचेती महाविद्यालय, सिंहगड संस्था, सूर्यदत्ता संस्था, भारती विद्यापीठ, सेवांकुर भारत, ढोले पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, अष्टांग व टिळक आयुर्वेद महाविद्यालय, रंगूनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, ब्रिजलाल जिंदाल फिजिओथेरपी, नवले शिक्षण संस्था, ससून रुग्णालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आदी संस्थांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या शिबिरांमध्ये फिजिओथेरपी, थकवा कमी करणाऱ्या मालिश, तसेच मानसिक ऊर्जा वाढवणाऱ्या संवादाच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. याविषयी माहिती देताना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, “या उपक्रमाद्वारे विठुरायाच्या सेवेसाठी चाललेल्या पायी वारीतील वारकऱ्यांना थोडा विरंगुळा आणि आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.”

get_footer();