25 लाखांची रोकड जप्त : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा गुंडा विरोधी पथकाची कारवाई
महाराष्ट्र 360 न्यूज नेवटर्क
पुणे : सध्या सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये एका हिस्ट्रीशीटरचा समावेश आहे. ही कारवारी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एका फ्लॅटवर छापा टाकून केली.
या कारवाईत पोलिसांनी 25 लाख रुपये, 8 मोबाईल, बेटिंग खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. अटक हिस्ट्रीशीटरने आपले ‘कॉन्टॅक्ट’वर पर्यंत असल्याचे सांगत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. सनी उर्फ भूपेंद्र चरणजीतसिंग गिल (वय – 38 रा. काळेवाडी), रिक्की राजेश खेमचंदानी (वय – 36 रा. डिलक्स थिएटरमागे, पिंपरी), सुभाष रामकिसन अगरवाल (वय – 57 रा. पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे असून, सनी सुखेजा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक हजरतअली पठाण यांनी रविवारी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आयपीएल क्रिकेट सामान्यांवर काळेवाडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये बेटिंग सुरु असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना मिळाली. त्यानुसार गुंडा विरोधी पथकाने काळेवाडी येथील राजवाडेनगर, वैभव पॅराडाईज, पहिला मजला फ्लॅट नं. 106 फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकला. अटक करण्यात आलेल्या सनी गिल हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आयपीएल सिझन सुरु झाल्यापासून शहरातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुंडा विरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि सहायक पोलीस आयुक्त गुन्हे प्रशांत अमृतकर घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले की, आयपीएलच्या गुजरात टायटन आणि दिल्ली कॅपिटल या सामन्यांवर बेटिंग सुरु असल्याची माहिती मिळाली होती. काळेवाडी येथील एका सोसायटीमध्ये घरात बेटिंग सुरु असलेल्या बेटिंगवर गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने आणि त्यांच्या पथकाने छापा मारला. घरात रंगेहाथ बेटिंग घेताना – खेळताना पोलिसांनी पकडले. मोठ्या प्रमाणात पैसे आणि इतर साहित्य आढळून आले.
पोलिसांकडून कारवाई केली जात असताना आरोपी सनी गिल याने सरकारी कामात अडथळा निर्माण केला. मला हात लावायचा नाही, माझी ओळख वर पर्यंत आहे. माझ्यावर कारवाई केल्यास चांगले होणार नाही, अशी धमकी पोलिसांना देऊन पोलिसांसोबत झटापट केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर वेगळा गुन्हा दाखल केला आहे. गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने, हजरत पठाण, पोलीस नाईक विजय तेलेवार, मयुर दळवी, सुनील चौधरी, तौसिफ खान यांनी ही दमदार कामगिरी केली.
