आंबेजोगाई पोलिसांत फिर्याद : पोलीस तपासात स्वखुशीने जाकीर सोबत आल्याचा खुलासा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नी अन् प्रियकराच्या त्रासामुळे पीएमपीचालकाने बीड जिल्ह्यातील मुळगावी जाऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे हा प्रकार उघडकीस आला. पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून सततच्या धमक्यांना वैतागून आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यानुसार पत्नी व तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
माधव प्रभाकर ढाकणे (वय-33 रा. अस्वलअंबा, ता. परळी, हल्ली रा. टकले नगर, शेवाळवाडी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. माधव ढाकणे पीएमपी बसवर चालक म्हणून काम करत होते. पुण्यात ते पत्नी व मुलासोबत राहत होते. 3 एप्रिल रोजी ते दुचाकीवरुन गावी आले होते. कुटुंबीयांनी एकटा का आला, असे विचारले असता पत्नी शोभा ही जाकीर मुजावर (रा. गोंधळेनगर, हडपसर याच्यासोबत पळून गेल्याचे सांगितले. दरम्यान माधव यांनी यासंदर्भात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे.
हडपसर पोलिसांनी तिचा शोध घेतला, मात्र तिने स्वखुशीने जाकीर सोबत आल्याचा खुलासा केला. माधव याने मुलाचा ताबा मागितला असता शोभा आणि जाकीर याने नकार देत पुणे सोडून निघून जा अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली. 5 एप्रील रोजी माधव याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला त्यावेळी पँटच्या खिशात सुसाइड नोट सापडली. या सुसाईड नोटमध्ये, पत्नी शोभा व जाकीर मुजावर यांच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. मुलाला आपण त्यांच्याकडून घेऊन यावे, अशी विनंतीही त्यांनी चिठ्ठीद्वारे केली आहे. मयत माधव यांचे भाऊ बालाजी प्रभाकर ढाकणे यांच्या तक्रारीवरुन शोभा ढाकणे व जाकीर मुजावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
