पुणे अँटी करप्शनची कारवाई : कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचा समावेश
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयातील तिघांना 15 हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. सोमवारी (दि.11) पुणे एसीबीने कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात सापळा रचला. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर कारवाई केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
सहाय्यक आयुक्त सचिन चंद्रकांत तामखेडे (वय-34), कनिष्ठ अभियंता अनंत रामभाऊ ठोक (वय-52), शिपाई दत्तात्रय मुरलीधर किंडरे (वय-47) अशी लाचखोर तिघांची नावे आहेत.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत 31 वर्षीय कंत्राटदाराने तक्रार केली आहे. तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून, त्यांनी कोथरुड येथील ड्रेनेज लाईन व काँक्रिटीकरणाच्या कामाचे बिल मिळण्यासाठी सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांची भेट घेतली. त्यावेळी तामखेडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीची अधिकाऱ्यांनी 31 मार्च रोजी पडताळणी केली असता तक्रारदार यांच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी तामखेडे यांनी तडजोडीत 15 हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांच्याकडून लाच घेण्यासाठी कनिष्ठ अभियंता अनंत ठोक याने मदत केली. तक्रारदार यांनी सचिन तामखेडे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी लाचेची रक्कम अनंत ठोक यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार हे ठोक यांच्याकडे लाचेची रक्कम देण्यासाठी गेले. मात्र, ठोक यांनी लाचेची रक्कम शिपाई दत्तात्रय किंडरे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी किंडरे यांच्याकडे लाचेची 15 हजार रुपयांची रक्कम दिली.
किंडरे याने लाचेची रक्कम स्विकारल्यावर तिघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींवर कोथरुड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.
