भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; खंडणी, खुनाच्या गुन्ह्यांचा समावेश
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
खंडणी, जबरी चोरी, खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांचा उच्छाद मांडणार्या ‘चुहा गँग’च्या म्होरक्यासह अन्य आरोपींवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ’मोक्का’ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कृत्यांना चाप बसण्याची पोलिसांना शक्यता आहे.
यातील म्होरक्याने आणि त्याच्या साथीदारांनी तीन जुलैला रात्री साडेआठ वाजता फिर्यादी कात्रज येथील फर्यादीवर कोयत्याने वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीसह त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक केली. आरोपी संघटितपणे 2017 पासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत आहेत. त्यांच्यावर तसे गुन्हेही दाखल आहेत. आरोपींवर हद्दपारीची कारवाई करूनही आरोपींमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांच्याविरुद्ध ’मोक्का’अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वरीष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे पाठविला. त्यानंतर शिंदे यांनी संबंधित कारवाईला मंजुरी दिली. या कारवाईत रवींद्र भोसले, विक्रम सावंत, राहुल तांबे, सचिन पवार, सर्फराज देशमुख आणि अभिजित जाधव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.
दरम्यान, सराईत गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी पुणे पोलिसांकडून महाराष्ट्र संघटित गुन्हेगार प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) होणारी कारवाई अधिक तीव्र होऊ लागली आहे. त्यातच ’चुहा गँग’च्या म्होरक्यांसह अन्य आरोपींवरही पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ’मोक्का’ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
