अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा परिसरातल्या सनसिटी सोसायटीतल्या शॉपिंग सेंटर समोर एल.एस.डी या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या शुभम भोरकडे या पंचवीस वर्षीय तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरूद्ध येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विक्री प्रकरणी पेट्रोलिंग करतेवेळी सहायक पोलिस फौजदार शिवाजी घुले यांना एलएसडी च्या विक्रीसाठी इसम येणार असल्याची खबर मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सापळा लावून छापा टाकला असता शुभम भोरकडे हा संशयास्पद हालचाली करताना आढळला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आले आणि झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे रूपये 30 हजार किंमतीचा एलएसडी पेपर हा अमली पदार्थ, 90 हजार रूपये किमतीचा मोबाईल, 60 हजार रूपये किंमतीची बाईक असा एकूण 1 लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्यावर अमली पदार्थ कायदा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला येरवडा पोलिस स्टेशनकडे हस्तांतरीत करण्यात आले.
वरील कारवाई, गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त रितेशकुमार, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, गुन्हे शाखेचे मा. सहा. पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक 2 चे अधिकारी पोलिस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलिस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, शुभांगी नरके सहायक पोलिस फौजदार शिवाजी घुले, पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, आप्पा रोकडे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, योगेश मांढरे, अझीम शेख, दिनेश बास्टेवाड यांनी केली.
