आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अपहृत अल्पवयीन मुलगी अवघ्या २४ तासांत ताब्यात

maharashtrajainwarta • Previous Issue • July 26, 2021
Spread the love

बार्शी शहर पोलिसांची कामगिरी : मोबाईल लोकेशनवरून अपहरणकर्ता जाळ्यात

बार्शी : पवन श्रीश्रीमाळ
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

अपहरण झालेल्या दहावीतील एका अल्पवयीन मुलीस अवघ्या २४ तासांत ताब्यात घेण्यात बार्शी शहर पोलिसांना यश आले असून, मोबाईल लोकेशनवरून अपहरणकर्त्यास जेरबंद करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरांवर कौतुक होत आहे.

बार्शी शहरातून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा अवघ्या चोवीस तासात तपास करून अपहरणकर्त्या आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. ही कामगिरी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता जाधव आणि पोलीस नाईक श्रीमंत खराडे यांनी केली आहे.
बार्शीत दहावीमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी २० जुलै रोजी दुपारी अडीच वाजता शिकवणीला जाते, असे सांगून घरातून बाहेर गेली. मात्र सायंकाळी पाच वाजले तरी घरी परत आली नाही म्हणून विचारपूस केली असता, ती फिर्यादीच्या नात्यातील एका २४वर्षीय तरुणासोबत गेली असल्याचे समजले. याबाबत मुलीच्या आईने २१ जुलै रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता जाधव आणि श्रीमंत खराडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
याबाबत शहर पोलिसांनी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या सायबर विभागाच्या मदतीने आरोपीच्या मोबाईलच्या लोकेशनवरून माहिती घेऊन तांत्रिक मुद्दे तपासून अवघ्या चोवीस तासांत आरोपीचा शोध घेऊन आरोपीला अटक करून अल्पवयीन मुलगी ताब्यात घेतली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करीत आहेत. अटक करून आरोपीला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

उत्तम तपासाबद्दल पोलिसांचा सत्कार
सहपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता जाधव आणि पोलीस नाईक श्रीमंत खराडे यांनी उत्तम तपास केला म्हणून त्यांचा महिला दक्षता समिती बार्शी शहर यांनी सत्कार केला आणि त्यांना पुढील कार्यास शुभेच्छादेखील दिल्या.