आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दहशत निर्माण करणार्‍या गुन्हेगारी टोळीवर कोंढवा पोलिसांची ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

maharashtrajainwarta • Previous Issue • July 28, 2021
Spread the love

दुश्मनाच्या खुनाची दिली सुपारी : शस्त्रसाठ्यासह एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत

पुणे : अभिजीत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणार्‍या टोळीप्रमुखाच्या गुन्हेगारी टोळीवर कोंढवा पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोक्का)अंतर्गत कारवाई केली आहे. संबंधित टोळीप्रमुखाने दुश्मनाच्या खुनाची सुपारी दिली होती. मात्र त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने एकाचे प्राण वाचले आहेत. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून शस्त्रसाठ्यासह एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्यातील टोळीप्रमुख असलेल्या आरोपीने आपल्या इतर तीन साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करून आपल्या एका दुश्मनाचा खून करण्याकरिता दोन आरोपींसह एकाच्या रुममध्ये कट रचून त्याच्या दुश्मनाच्या खुनाची सुपारी दिली. तसेच हा खून करण्याकरिता गावठी पिस्टल व पैसे दिले होते.
14 जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास कोंढवा पोलीस स्टेशनचे सुशील धिवार यांना संबंधित आरोपी हा कोणाचा तरी खून करण्यासाठी जवळ पिस्टल बाळगून आहे, अशी माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व तपास पथकातील पोलीस हवालदार योगेश कुंभार, पोलीस नाईक सुशील धिवार, पृथ्वीराज पांडुळे, गणेश चिंचकर, मोहन मिसाळ, महेश राठोड, पोलीस शिपाई अभिजित रत्नपारखी यांनी सापळा रचून दोघांना लुल्लानगर ब्रिजखाली पकडले. तेव्हा त्या दोघांकडे मिळून तीन गावठी पिस्टल, सहा मॅगझीन, जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा आणि सुपारीची रोख रक्कम 1,20,000 रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्याकडे विचारपूस केली असता सदरचा मुद्देमाल त्याने त्याच्या दुश्मनाचा खून करण्यासाठी दिल्याचे सांगितले.
सदर आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. यातील टोळीप्रमुखास 22 जुलै रोजी गुजरात-राजस्थान बार्डर येथून ताब्यात घेऊन कोंढवा पोलीस स्टेशन येथे आणून अटक करण्यात आली. अशा प्रकारे टोळी प्रमुखाचा त्याच्या दुश्मनास मारण्याचा डाव उधळून लावला.
गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपीने आपल्या नेतृत्वाखाली त्याच्या साथीदारांसमवेत संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असून, वेळोवेळी टोळीमधील सदस्यांना बदलून त्यांना बरोबर घेऊन बेकायदा मार्गाने गुन्हे करून त्यायोगे स्वतसाठी अथवा टोळीतील अन्य सदस्यांसाठी अवैध आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने व त्या भागामध्ये आपल्या संघटित गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व राहावे या उददेशाने त्यांनी हमरस्त्यावर गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, दंगा, मारामारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे वारंवार वेगवेगळ्या टोळी सदस्यासोबत संघटितरीत्या करत आहेत. तसेच टोळी प्रमुखाने व त्याच्या संघटित टोळीने लोकांमध्ये दहशत पसरवून स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याकरिता गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले होते.
सदर गुन्ह्यात पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उप-आयुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद यांनी वरिष्ठ कार्यालयात वेळेत प्रस्ताव सादर करून सदर गुन्ह्यात अपर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग पुणे शहर यांच्या पूर्वमान्यतेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999च्या कलमाचा अंतर्भाव करण्यात आला असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास राजेंद्र गलांडे हे करीत आहेत.