दत्तवाडी पोलिसांची कारवाई : चाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
शहरात हत्यारे व अवैधरीत्या अग्निशस्त्रे बाळगणार्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने, दत्तवाडी पोलिसांनी कारवाई करत दांडेकर पुलावर एका युवकास जेरबंद केले असून, त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण चाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या हेतूने शहरात हत्यारे व अवैधरीत्या अग्निशस्त्रे बाळगणार्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार दत्तवाडी पोलीस स्टेशनकडील तपासपथक अधिकारी आणि कर्मचारी हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार कुंदन शिंदे आणि पोलीस अंमलदार अमित सुर्वे व अक्षयकुमार वाबळे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “एक इसम देशी बनावटीचे पिस्टल घेऊन मागीरबाबा मंदिराजवळील टेम्पो स्टॅन्डमागे फुटपाथवर त्याच्या राजेंद्रनगर, नवी पेठ येथील मित्राला भेटण्यासाठी थांबलेला असून, तो काहीतरी गंभीर अपराध करण्याची शक्यता आहे.” सदर बातमीची खात्री करून पोलीस उपनिरिक्षक स्वप्निल लोहार, दत्तवाडी पोलीस ठाणे व तपासपथक कर्मचारी यांनी सापळा रचून सदर 37 वर्षीय इसमास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडीत त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 40,400 रुपयांचा माल मिळून आला असून, त्याच्याविरुध्द दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी हा दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीत राहण्यास असून, उदरनिर्वाहाकरिता रिक्षा चालवितो. दहशत निर्माण करण्याकरिता त्याने सदर पिस्टल बाळगल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले असून, सदरचे पिस्टल त्याने कोठून मिळविले व त्याचा यापूर्वी कोठे वापर केलेला आहे काय, तसेच सदरचे पिस्टल त्याने स्वतःजवळ बाळगण्यामागे त्याचा नक्की काय उद्देश होता, याबाबत दत्तवाडी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक स्वप्निल लोहार हे स्वतः करीत आहेत.
सदरची कारवाई ही, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सिंहगड विभाग पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर आणि पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, पोलीस अंमलदार अमित सुर्वे, महेश गाढवे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, सागर सुतकर, प्रमोद भोसले, शरद राऊत आणि विष्णू सुतार यांनी केली आहे.
