आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वाजवी दरात युरिया वाटपाचा उपक्रम स्तुत्य

maharashtrajainwarta • Previous Issue • August 4, 2021
Spread the love

दिलीप राऊत : श्रीराम एजन्सीज् आणि बार्शी तालुका कृषी विभाग यांचा संयुक्त उपक्रम

बार्शी : पवन श्रीश्रीमाळ
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

सध्या टंचाईच्या काळात श्रीराम एजन्सीज् आणि बार्शी तालुका कृषी विभाग यांनी संयुक्तपणे राबविलेला वाजवी दरात युरिया वाटपाचा उपक्रम फार कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन प्रभारी तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत यांनी केले. रविवारी मैत्रादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
श्रीराम एजन्सीज् बार्शी व बार्शी तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 2 ऑगस्ट रोजी मैत्रीदिनानिमित्त वाजवी दरात युरिया वाटप हा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी कृषी विभाग कार्यालय बार्शीचे गणेश पाटील, बार्शी रासायनिक खते, बी-बियाणे व कीटकनाशक असोसिएशनचे तालुका अध्यक्ष दिनेश सुपेकर, रोटरी क्लब बार्शीचे अध्यक्ष विक्रम सावळे, युवा उद्योजक कपिल मुनोत, सागर सोत्रे, गणेश लकशेट्टी आदी उपस्थित होते.
या वेळी राऊत पुढे म्हणाले की, सध्या तालुक्यात पाऊस चांगला झाला असून, शेतकर्‍यांची पेरणी व शेती कामाची लगबग सुरू असताना अशा परिस्थितीत युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे, परंतु शेतकरी व कृषिविक्रेते यांच्यातील मैत्रीचे एक उत्तम उदाहरण श्रीराम एजन्सीजने दाखवून दिले व शेतकर्‍यांची अडचण दूर व्हावी म्हणून फूल नाही पण फुलाची पाकळी म्हणून त्यांनी सध्याचे सर्व नियम पाळून शेतकर्‍यांना युरिया वाटपाचे कार्य केले.
यावेळी कृषी विभाग कार्यालयाचे गणेश पाटील, रासायनिक खते असोसिएशनचे दिनेश सुपेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष विक्रम सावळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शेतकरी बांधव, व्यापारी वर्ग सर्व नियमांचे पालन करून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. दिनेश श्रीश्रीमाळ यांनी केले, तर आभार विशाल श्रीश्रीमाळ यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ नांदेडकर, गणेश भुईटे, पवन झंवर, संजय महाकर, संतोष कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे. त्यामुळे शेतकरीराजाची टंचाईची बाजू लक्षात घेऊन हा उपक्रम राबविला आहे. यापुढेही कृषी खात्याने असेच सहकार्य केल्यास आपण शेतकरीहिताचे वेगवेगळे उपक्रम राबवू.
विशाल श्रीश्रीमाळ, श्रीराम एजन्सीज्