दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 2 गुन्हे शाखेची कामगिरी : पाऊणेपाच लाखांची 15 वाहने हस्तगत
पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 2 गुन्हे शाखा, पुणे शहरने अनोखी कामगिरी करत नव्याने उदयास आलेल्या बुलेट आणि दुचाकी वाहने चोरणार्या टोळीस जेरबंद केले असून, एकूण बारा गुन्हे उघडकीस आणत पाऊणेपाच लाख रुपयांची 15 वाहने हस्तगत केली आहेत.
मंगळवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी पुणे शहर पूर्व विभागात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2 चे अधिकारी व अंमलदार वाहन चोरीस आळा घालणे तसेच वाहन चोरीचे गुन्हेगारांवर परिणामकारक कारवाई करण्याकामी, तसेच पुणे शहरातील मोक्का व इतर गुन्ह्यातील फरारी आरोपींना पकडण्याकरिता दोन टीममध्ये हडपसर, वानवडी, मुंढवा, चंदननगर पोलीस स्टेशनच्या हृद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक शिवाजी जाधव यांना मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत केशवनगर मांजरी रोडच्या पेट्रोल पंपाजवळील 40 फुटी रोडजवळ केशवनगर मुंढवा, पुणे येथे 22 वर्षीय दोघा संशयित इसमांना ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडे 30,000 रुपये किमतीची संशयित होंडा अॅक्टिवा मिळाली.
आरोपींना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2च्या हडपसर येथील कार्यालयात आणून त्यांच्याकडे आणखी सखोल तपास केला असता, त्यांनी व त्यांचा आणखी एक साथीदार, असे तिघांनी मिळून आणखी काही वाहनचोरीचे गुन्हे केल्याबाबत कबुली दिल्याने तपासात त्यांच्याकडून एकूण बारा गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यात चोरीची पंधरा दुचाकी वाहने असा एकूण चार लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच इतर तीन वाहनांबाबत तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक, गुंगा जगताप आणि पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, विनायक रामाणे, शाकीर खान, मनोज शिंदे, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव, दत्तात्रय खरपुड, अमोल सरतापे यांनी केली आहे.
अशी आहेत चोरीची वाहने
जप्त करण्यात आलेल्या दुचाकी वाहनांमध्ये एकूण 50,000 रुपयांच्या दोन आणि एक लाख रुपयांची एक अशा तीन रॉयल इन्फेल्ट बुलेट, 75,000 रुपयांची एक क्लासिक बुलेट, 20,000 रुपये किमतीच्या एकूण तीन, तसेच अनुक्रमे दहा हजार, पंधरा हजार, पंचवीस हजार आणि चाळीस हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी अशा एकूण अकरा वाहनांचा समावेश आहे.
