गोखलेनगरमधील घटना : ‘आई, बाळाची काळजी घे’ अशी चिठ्ठी लिहून ठेवली
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
गोखलेनगरमध्ये रविवारी सायंकाळी किरकोळ वादातून कुटुंबातील सदस्यांनी पत्नीला टॉयलेट क्लीनर पाजल्याचे समोर आले. घटनेनंतर रुग्णालयात जाऊन पत्नीला पाहण्यासाठी गेला असता सासरच्या मंडळींनी अपमान केला. त्यामुळे त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी आईला ‘बाळाची काळजी घे’ असे चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.
निखिल धोत्रे (वय २८, रा. गोखले नगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, निखिलने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून, त्यामध्ये सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासामुळेच आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांनी सांगितले की, निखिल हा इमारतींच्या सेंटरिंगचे काम करीत होता. गोखलेनगरमध्ये निखिल गर्भवती पत्नी, भाऊ व आईसमवेत राहत होता. बुधवारी (दि. १८) निखिलची पत्नी फोनवर बोलत असताना कुटुंबीयांची तिच्यासमवेत भांडणे झाली. त्यावेळी निखिलने पत्नीला मारहाण केली, तर इतरांनी निखिलच्या पत्नीला टॉयलेट क्लीनर पाजले. त्यानंतर तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी निखिल, त्याची आई व भावाविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रविवारी निखिल पत्नीला भेटण्यासाठी रुग्णालयात गेला असता सासरच्या मंडळींनी त्याचा अपमान केला. निखिलकडून सासरच्या मंडळींनी १ लाख ३० हजार रुपये घेतल्याने तो कर्जबाजारी झाला होता. या सर्व गोष्टींमुळे तो नैराश्यात होता. त्यानंतर रविवारी घरात कोणी नसताना त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. निखिलचे कुटुंबीय घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस तपास करीत आहेत.
‘आई, माझ्या बाळाची काळजी घे!’
निखिलने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये त्याने ‘आई, तू काळजी करू नको, मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेईल. माझ्या बाळाला सांभाळ. त्याची काळजी घे.’ अशा शब्दांत आईला भावनिक साद घातली आहे. सासुरवाडीकडून होणाऱ्या छळास कंटाळून आपण आत्महत्या करत आहे. या चिठ्ठीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांच्या नावांचा उल्लेख असून त्यांना सासरवाडीच्या लोकांवर कडक कारवाई करण्याची विनंतीही केली आहे.
