येरवडा पोलिसांची कामगिरी : साडेचार लाख रुपयांचा ऐवज
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
रिक्षाने लेमन ट्री हॉटेल येरवडा ते साकोरेनगर विमाननगर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशाची लॅपटॉपची बॅग विसरली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दोन दिवस तपास करून रिक्षाचालकाला हडपसरमधून शोधून काढले. लिनोवो कंपनीचा लॅपटॉप, ८ पी २ मेमरी कार्ड, ६४ जीबी असा एकूण साडेचार लाख रुपयांचा ऐवजाची बॅग फिर्यादींना परत दिली.
पोलिसांनी सांगितले की, झी मीडियाचे न्यूज रिपोर्टर विकास सिंग आणि मयंक शर्मा दिल्लीतून कामानिमित्त २७ ऑगस्ट २०२१ रोजी पुण्यात आले. त्यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास ते लेमन ट्री हॉटेल येरवडा ते साकोरेनगर विमाननगर दरम्यान रिक्षाने प्रवास केला. मात्र, त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरली. त्यांनी बॅग हरविल्याची येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
दरम्यान, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख व पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील, पोलीस शिपाई अजित वाघुले, स्वप्नील मराठे यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या फूटजेच्या माध्यमातून रिक्षा हडपसरमध्ये असल्याचे आढळून आले. रिक्षाचालक अनिल महादेव काळे यांच्याकडून लॅपटॉप असलेली बॅग घेऊन तक्रारदारांना दिली.
