युनिट १ गुन्हे शाखा पुणेची कामगिरी : खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सराईताकडून पन्नास हजारांच्या पिस्टलसह काडतूस जप्त करण्यात युनिट १ गुन्हे शाखा पुणेला यश आले असून, खून, खुनाचा प्रयत्न, मारामारीचे तीन गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) युनिट १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे युनिट-१ च्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे आणि महेश बामगुडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सचिन रणदिवे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार मीरा सोसायटी, शंकरशेठ रोड, पुणे या ठिकाणी रोडवर उभा आहे.
या बातमीचा आशय वरिष्ठांना कळवून त्यांच्या परवानगीने युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडील स्टाफसह बातमीप्रमाणे दोन पंचासह जाऊन छापा घातला असता, आरोपी सचिन आप्पा रणदिवे (वय ३१, रा. शनीनगर, आंबेगाव खुर्द, पुणे) यास ताब्यात घेण्यात आले. स्टाफच्या मदतीने पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता, त्याच्या शर्टच्या आत लपवून ठेवलेली एक पिस्टल आणि एक काडतूस मिळून आल्याने सदरचा ५१,००० रुपये किमतीचा माल पंचासमक्ष जप्त करुन त्याच्याविरुद्ध खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर आरोपीने सदरचे पिस्टल जवळ बाळगण्याचा मुख्य उद्देश काय आहे, याबाबत अधिक तपास करता त्याने सांगितले की, त्याने एकाचा सन २०१० मध्ये खून केला होता. त्याच्यापासून जिवाला भीती असल्याने सदरचे पिस्टल सोबत ठेवले होते. सदर आरोपीविरुद्ध हवेली पोलीस ठाणे पुणे ग्रामीण येथे खून, खुनाचा प्रयत्न, मारामारीचे तीन गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी आर्थिक व सायबर गुन्हे शाखा पुणे शहर चे पोलीस उपआयुक्त भाग्यश्री नवटके (अति कार्यभार अपर पोलीस आयुक्त गुन्हे), पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदशनाखाली युनिट १ गुन्हे शाखा, पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, संजय गायकवाड पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, अशोक माने, शशिकांत दरेकर, विजयसिंग वसावे यांनी केली आहे.
