आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जीवाच्या भीतीने पिस्टल बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 2, 2021
Spread the love

युनिट-१ची कारवाई : पिस्टल आणि जीवंत काडतूस केले जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

सराईत गुन्हेगाराला सापळा रचून अटक करुन त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्टल आणि एक जीवंत काडतूस जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शखा युनिट-१च्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याने 11 वर्षापूर्वी खून केला होता. त्यामुळे त्याला भीती वाटत होती. त्यामुळे त्याने पिस्टल जवळ बाळगल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारी (दि.27) केली.

सचिन अप्पा रणदिवे (वय 31, रा. शनीनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी अंमलदार दत्ता सोनवणे व महेश बामगुडे यांना सराईत गुन्हेगार सचिन रणदिवे हा शंकरशेठ रोडवरील मिरा सोसायटी येथील रस्त्यावर उभा असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी सचिन रणदिवेला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 1 पिस्टल आणि 1 काडतुस असा एकूण 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडे केलेल्या चौकशी त्याने 2010 मध्ये एकाचा खून केला होता. त्याच्यापासून त्याला जीवाची भीती वाटत होती. त्यामुळे त्याने पिस्टल जवळ बाळगले असे आरोपीने सांगितले. आरोपीवर पुणे ग्रामीण पोलीस दलातील हवेली पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे तीन गुन्हे दाखल आहेत.

आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त (अति. कार्यभार अपर पोलीस आयुक्त गुन्हे) भाग्यश्री नेवटके, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, अशोक माने, शशीकांत दरेकर, विजयसिंग वसावे यांनी ही कामगिरी केली.