आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विमानतळ परिसरात १५ किमी अंतरावर प्रखर लाईट बीम वापरावर बंदी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 9, 2021
Spread the love

डॉ. रवींद्र शिसवे : विमान आणि हेलिकॉप्टरचा अपघात टाळण्यासाठी उपाययोजना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

लोहगाव वायूसेना व नागरी विमानतळाच्या सुमारे १५ कि.मी. अंतराच्या वायूक्षेत्र परिघामध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत प्रखर लाईट बीम वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बुधवार, दि. ८ सप्टेंबर २०२१ पासून दोन महिने कोणालाही वैयक्तिक वा कार्यक्रम आयोजकांना प्रखर लाईट बीम आकाशात सोडता येणार नाही. कायद्याचे कोणी उल्लंघन केले, तर कारवाई केली जाईल, असे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

डॉ. शिसवे म्हणाले की, लोहगाव टेक्निकल विमानतळ व नागरी विमानतळ पुणे शहर येथे दिवसा व रात्री वेगवेगळ्या एअर लाईन्स व भारतीय वायू सेनेची विमाने व हेलिकॉप्टर उतरतात आणि उड्डाण करतात. रात्रीच्या वेळी वैमानिकांना दिशा व ठिकाण दाखविण्यासाठी रनवेवर व एटीसी टॉवरकडून संकेतासाठी लाईटचा उपयोग करण्यात येतो. मात्र, लोहगाव विमानतळाचे वायूक्षेत्राजवळच्या परिसरात विविध कार्यक्रमाच्या वेळी आकाशामध्ये प्रखर लाईट बीमचा उपयोग केला जातो. त्यामुळे वैमानिकांचे डोळे दीपून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांसाठी सायंकाळी ६ ते सकाळी ६ दरम्यान प्रखर लाईट बीम वापरावर बंदी घातली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.