केदारी पेट्रोल पंपासमोर सापडलेले पाकिट कोंढवा पोलिसांकडे जमा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पाकिटमारी, मंगळसूत्र चोरी, रोख रक्कम आणि मोबाईल अशा चोरीच्या घटना दररोज होत आहेत. मात्र, दुसरीकडे रस्त्यात सापडलेले महत्त्वाचे कागदपत्र आणि रोख रक्कम असलेले पाकिट परत करून सामान्य नागरिकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले.
पोलिसांनी सांगितले की, सतीश वर्मा (वय ४४, रा. राजविहार सोसायटी, सनशाईन हिलसमोर उंड्री) यांना साळुंके विहार येथील केदारी पेट्रोल पंपाजवळील रस्त्याने जात होते. त्यावेळी त्यांना पाकिट सापडले. त्यांनी जवळच्या वाहतूक पोलिसाकडे दिले. मात्र, त्यांनी कोंढवा पोलीस चौकीमध्ये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार कोंढवा पोलीस चौकीमध्ये पोलीस जमादार दिलीप भिलारे यांच्याकडे दिले.
त्यांनी पाकिट उघडून पाहिले असता, पाकिटामध्ये पॅनकार्ड, आरसी स्मार्ट कार्ड, बँक एटीएम, कॉलेजचे ओळखपत्र व रोख चार हजार रुपये मिळून आले. ओळखपत्रामध्ये खालीद महमद (वय २३, रा. येवलेवाडी लेक डिस्ट्रीक, कोंढवा) असा पत्ता आढळून आला असून त्याला परत करण्यात आले. या वेळी सतीश वर्मा यांच्या कामगिरीचे ए.पी.आय. दगडे मॅडम व पी.आय. जगन्नाथ जाणकार यांनी कौतुक केले.
