तीन महिन्यांपासून फरार हनुमंत केमधरे अखेर जेरबंद : शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
पुणे : महाराष्ट्र न्यूज ३६०
शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्यातील ‘वाँटेड’ आणि तीन महिन्यांपासून फरार मुख्य आरोपी हनुमंत केमधरे याला जेरबंद
करण्यात आर्थिक व सायबर गुन्हे शाखेला यश आले असून, न्यायालयाने आरोपीस १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक लिमिटेड शिवाजीनगर, पुणे बँक घोटाळा या गुन्ह्यात अटक व पाहिजे असलेल्या आरोपीतांनी एकूण ४९६ कोटी ४६ लाख इतक्या रुपयांच्या ठेवीदारांच्या ठेवींच्या रक्कमांचा बनावट व खोटी कर्ज प्रकरणे करून ठेवीदारांचा अन्यायाने विश्वासघात करून अपहार करून फसवणूक केली आहे.
नमूद गुन्ह्यात आरोपी अनिल शिवाजीराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव, तानाजी दत्तू पडवळ, शैलेश संपतराव भोसले, मंगलदास विठ्ठल बांदल, हितेन उर्फ हितेंद्र विराभाई पटेल आणि मनोजकुमार प्राणनाथ अब्रोल या सात आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली असून, सर्व आरोपी हे येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
नमूद गुन्ह्यातील महत्त्वाचा पाहिजे असलेला आरोपी हनुमंत संभाजी केमधरे (कर्ज अधीक्षक व वसुली अधिकारी, शिवाजीराव भोसले सहकारी बँक लि, शिवाजीनगर, पुणे) हा सुमारे तीन महिन्यांपासून फरार होता. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध पकडवॉरंटदेखील जारी केले होते. पाहिजे असलेला आरोपी हनुमंत संभाजी केमधरे यांचा शोध घेणेकामी पोलीस उपआयुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. त्या पथकात रवींद्र गवारी, पोलीस सबइन्स्पेक्टर व पोलीस कॉन्स्टेबल शिरीष गावडे यांची नेमणूक करून त्यांच्यावर आरोपी पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली, ज्यांनी काही दिवसांपूर्वी बीएचआर घोटाळ्यामधील मुख्य आरोपी जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले होते.
नमूद पाहिजे असलेला आरोपी हनुमंत संभाजी केमधरे याने त्याचे वापरते सर्व मोबाईल बंद केले होते आणि तो त्यांच्या कुटुंबातील कोणाशीही संपर्क साधत नव्हता. सायबर पोलीस स्टेशनकडील रवींद्र गवारी, पोलीस सबइन्स्पेक्टर आणि पोलीस कॉन्स्टेबल शिरीष गावडे यांनी अथक परिश्रम करून आरोपी वापरत असलेल्या टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम व सोशल मीडिया या सर्वांचा तांत्रिक तपास करून आरोपीच्या ठावठिकाणाबाबत माहिती प्राप्त केली. त्या वेळी त्यांचे असे लक्षात आले की, पाहिजे आरोपी हा त्याची ओळख लपवून तसेच पोलिसांना त्याचा कोणत्याही प्रकारे सुगावा लागणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेऊन त्याचा मित्र व भागीदार रज्जाक मुलाणी याचे मु. पो. नायगाव (चोंडकर वस्ती, ता. पुरंदर, जि. पुणे) येथील फार्महाऊसवर राहण्यास होता. आरोपीच्या ठावठिकाणापर्यंत रवींद्र गवारी, पोलीस सबइन्स्पेक्टर व पोलीस कॉन्स्टेबल शिरीष गावडे हे पोहचले व त्यांनी वेषांतर करून पाहिजे असलेल्या आरोपीची खात्री झाल्यानंतर त्यास बुधवारी (०८ सप्टेंबर) मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. नमूद आरोपीस अटक केल्यानंतर न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने त्यास १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.
नमूद आरोपी याने शिवाजीराव भोसले सहकारी बँक लि. शिवाजीनगर, पुणे बँकेचे चेअरमन अटक आरोपी अनिल शिवाजीराव भोसले व अटक आरोपी नामे मंगलदास विठ्ठलराव बांदल (रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्या आर्थिक फायद्यासाठी मोठ्या प्रमाणावर बनावट व खोटी कर्ज प्रकरणे करून ठेवीदारांच्या ठेवींच्या रक्कमांचा अपहार करून फसवणूक केली व त्या अपहाराच्या रकमेतून मोठ्या प्रमाणावर बेनामी मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत.
नमूद गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश वाळके, सहायक पोलीस महेंद्र जगताप, उपनिरीक्षक महेश मते, महिला पोलीस अंमलदार कोमल पडवळ हे करीत आहेत.
