पोलीस आयुक्त गुप्तांकडून आदेश जारी : आगीचा लोळ/ दिवे/ फुगे सोडण्यास मनाई
पुणे : महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क
गणेशोत्सव काळात कलम १४४ अन्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ज्वालाग्राही पदार्थांवर बंदीचे आदेश दिले असून, आगीचा लोळ/दिवे/फुगे सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात काही तरुण उत्साहाच्या भरात सार्वजनिक ठिकाणी आगीचा लोळ निर्माण करणे / हवेत रॉकेट, दिवे, फुगे, सोडणे आदी प्रकार करतात. यामुळे अपघातास आमंत्रण मिळून होणारी जीवित वा मालमत्तेची हानी टाळणेकरिता दरवर्षी सी.आर.पी.सी. १४४ अन्वये मनाई आदेश जारी करण्यात येतो.
सध्या ब्रेक द चेन अंतर्गत पुणे महानगर पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या आदेशांची अंमलबजावणी सुरू असून पुणे पोलिसांकडून त्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही आदेश जारी करण्यात आलेले नाहीत.
या पार्श्वभूमीवर सहा दिवसांपूर्वी दि.०३/०९/२०२१ रोजी गणेशोत्सवाचे पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात हवेत ज्वालाग्राही पदार्थाच्या साहाय्याने आगीचा लोळ/ दिवे/ फुगे सोडण्यास मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यात अन्य कोणत्याही बाबींना मनाई करणारा आदेश अंतर्भूत नाही, याची नोंद घ्यावी असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नमुद केले आहे.
