श्री शिवाजी शिक्षण मंडळाच्या बदनामी प्रकरण : २५ लाख रु. अब्रुनुकसान भरपाईचा दावा दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील गौडगावमधील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या बदनामीबाबत अॅड. प्रशांत शेटे यांनी फौजदारी न्यायालयात दाखल केले होते. त्यानुसार भास्कर जगन्नाथ काकडे यांच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रक्रिया सुरू करण्याचे व संशयित काकडे यास न्यायालयात हजर राहण्याचे आदेश बार्शी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. सबनीस यांनी दिले आहेत.
सविस्तर माहिती अशी की, गौडगाव (ता. बार्शी) येथे संस्थापक श्री जनार्दन लोहकरे गुरुजी यांनी १९४३ साली शिक्षण संस्था स्थापन केली असून, संस्थेचा गौरव कर्मवीर भाऊराव पाटील, शरदचंद्रजी पवार यांनी केला आहे. संस्थेचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले आयटीआय असून, इंग्रजी शाळा, पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, पाणीपुरवठा योजना, भूकंपरोधक गृहप्रकल्प, टेलरिंग, पोल्ट्री, डेअरी, महिला शिक्षण, सोलर, फॅब्रिकेशन असे अनेक प्रोजेक्ट संस्थेच्या वतीने चालविण्यात येतात. सध्या संस्थेचे अध्यक्ष विनायकराव गणपतराव गरड, उपाध्यक्ष विश्वनाथ काकडे, खजिनदार मदनलाल खटोड, विश्वस्त बळवंतराव पाटील, अनिल गरड, अरुण भड, अशोक भड, जीवन लोहकरे, सचिव इंद्रसेन भड, सहसचिव पंडितराव लोहकरे कार्यरत आहेत.
ख्यातनाम संस्थेची बदनामी करण्याच्या हेतून माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे, अशा मजकुराचा अर्ज २ जुलै २०२० रोजी भास्कर काकडे यांनी मा. सहा. धर्मादाय आयुक्त यांना दिला आहे. तसेच दि. १५ जुलै २०२० रोजी काकडे उपोषणास बसला व मौजे गौडगाव येथील उपोषणस्थळी जमाव बोलावून संस्था व पदाधिकाऱ्यांची बदनामी करणारे भाषण केले. सदरचे भाषण फेसबुक, व्हाट्सअप प्रसारित करून नाहक बदनामी केली आहे. त्यामुळे काकडे विरुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायकराव गरड यांनी बार्शी येथील फौजदारी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला.
याप्रकरणी फिर्यादीतर्फे अॅड. प्रशांत शेटे यांचा युक्तिवाद मान्य करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. सबनीस यांनी भादवि कलम ५०० अन्वये आरोपीविरुद्ध फौजदारी खटला प्रक्रिया करून आरोपीस मे. कोर्टात हजर राहण्याचे आदेश दि. ९ ऑगस्ट २०२१ रोजी पारित केले आहे. तसेच संस्थेच्या वतीने झालेल्या बदनामीमुळे अब्रुनुकसानभरपाईसाठी २५ लाख रुपयांचा विशेष दिवाणी दावा क्र.२९-२०२० दावाही बार्शीतील मे. दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर येथे दाखल केला असून, दाव्यात हजर राहण्याचे आदेश मे. न्यायालयाने दिले आहेत. तशा प्रकारची नोटीसही काकडे यांना जारी केली आहे.
