आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हडपसरमधील आकाश भापकर टोळीवर मोक्काचा बडगा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 14, 2021
Spread the love

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची कारवाई : आतापर्यंत ५४ गँगवर मोक्काची दणक्यात अ‍ॅक्शन

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे शहरातील गुन्हेगारावर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उचलला आहे. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या भापकर टोळीच्या म्होरक्यासह 3 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 54 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

टोळीप्रमुख आकाश दादासाहेब भापकर (वय-19 रा. कवडीपाट, हनुमान मंदिराजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली), योगीराज उर्फ भैय्या संदिप पानसरे (वय-21 रा. काळुबाई वसाहत, माळवाडी, हडपसर), अभिजीत संजय सावंत (वय-23 रा. शिवपार्क, पावर हाऊस, फुरसुंगी, पुणे) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

आरोपींनी गाडी पुसण्यास कापड न दिल्याच्या रागातून एका तरुणावर चाकूने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मित्राच्या वडलांवर देखील आरोपींनी वार केले.


हा प्रकार 1 ऑगस्ट रोजी मांजरी येथे घडला होता. याप्रकरणी आरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी तडीपार कालावधीत विनापरवाना शहरात वास्तव्य करुन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. आरोपींवर पुणे शहरातील इतर पोलीस ठाण्यात खंडणी, हत्यारासह गंभीर दुखापत करणे असे एकूण पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत तो अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला.

या प्रस्तावाची पडताळणी करुन अपर पोलीस आयुक्तांनी प्रस्तावाला मंजूरी दिली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते करीत आहेत.

आतापर्यंत आयुक्तांची 54 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रणमिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 54 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे राजु अडागळे, दिगंबर शिंदे, गोरख दरेकर, पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, प्रशांत नरसाळे, बाबासाहेब शिंदे, गिरीश एकोर्गे यांच्या पथकाने केली.