गुन्हे शाखा युनिट-२ ची कामगिरी : जामिनावर सुटलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
आधी घरफोडी केलेल्या ठिकाणीच पुन्हा घरफोडी करण्यासाठी आलेला असताना जामिनावर सुटलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट-२ पुणे शहर पेलिसांना यश मिळाले असून, आरोपीकडून पाउणेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सहकारनगर पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा, युनिट २ कडील सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे हे करीत असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने आणि कादीर शेख यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, घरफोडी करणारा गुन्हेगार रफिक हुसेन शेख हा के. के. मार्केट पार्किंगमध्ये थांबला असून, त्याकडे लाल रंगाची टाव्हीएस मोपेड गाडी आहे आणि तो घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी कटावणीसह चोरी करण्याच्या तयारीने आला आहे. ही खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांना कळविले असता त्यांनी प्रकाश मोरे यांना कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले.
सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, पोलीस अंमलदार उत्तम तारु, गजानन सोनुने, निखील जाधव, समीर पटेल, कादीर शेख असे सर्व त्यांच्या खाजगी वाहनांवरून के. के. मार्केट सहकारनगर पुणे येथील पार्किंगमध्ये जाऊन गुप्तपणे पाहाणी करून आले आणि त्यांनी रफिक हुसेन शेख (वय २६, सय्यदनगर, हडपसर, पुणे) यास शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीस युनिट-२ कार्यालयात घेऊन आल्यानंतर त्याच्याकडे सखोल तपास केला असता, त्याने नुकतीच ४-५ दिवसांपूर्वी धनकवडी, सहकारनगर भागात दिवसा घरफोडी केल्याचे सांगितले असून, त्याने दोन घरफोडीचे गुन्हे, तसेच दोन वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले. त्याच्या ताब्यातून १,६०,००० रुपयांची रोख रक्कम आणि ३२.२९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, तसेच गुन्ह्यात वापरलेल्या गाडीसह इतर दोन चोरीच्या गाड्या, घरफोडी करण्यासाठी वापरलेले सायकलचे स्टॅन्ड (कटावणी) असा मुद्देमाल मिळाला असून, एकूण ३,८५,३५५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे.
आरोपीकडून सहकारनगर पोलीस स्टेशन २ गुन्हे, वानवडी पोलीस स्टेशन व हडपसर पोलीस स्टेशन प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण चार गुन्हे उघकीस आणले आहे. सदर आरोपी रेकॉर्डवरील असून, तो काही दिवसांपूर्वीच जेलमधून जामिनावर बाहेर आल्यावर त्याने हे गुन्हे केलेले आहेत. त्याचेवर एकूण ३६ गुन्हे दाखल आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, प्रभारी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटक्के, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, वैशाली भोसले, पोलीस अंमलदार यशवंत आंब्रे, उत्तम तारु, गजानन सोनुने, कादीर शेख, निखील जाधव, समीर पटेल, किशोर वग्गु, साधना ताम्हाणे, चंद्रकांत महाजन, मितेश चोरमोले, चेतन गोरे, संजय जाधव, करण ढंगारे यांनी केली आहे.
