युनिट-५ची कारवाई : घरफोडी-वाहनचोरीसह अनेक गुन्हे उघडकीस, साडेबारा लाखांचा ऐवज जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पोलिसांवर हल्ला करणारा मोक्कामधील कुख्यात फरारी आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडून घरफोडी व वाहनचोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्याकडून लाखांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई युनिट पाचच्या पथकाने केली.
जयसिंग ऊर्फ पिल्लुसिंग कालुसिंग जुनी (वय २८, रा. बिराजदारनगर, वैदूवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मोक्कांतर्गत कारवाई केलेला आणि कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलिसांना हत्याराचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न करून फरार होता. १५ दिवसांपूर्वी मुलीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली, त्यानुसार पोलिसांनी त्याच्या राहत्या घराजवळ सापळा रचून जेरबंद केले.
दरम्यान, आरोपीला पकडल्यानंतर त्याने स्वतःला मारुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याची बनवेगिरी मोडित काढली. अधिक तपासामध्ये साथीदार पाप्पासिंग दुधानी (रा. म्हाडा, हडपसर) याच्यासह मोटारसायकली व कार चोरी करून घरफोडीच्या ठिकाणची रेकी करीत घरफोडी व वाहनचोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १२ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली, दोन सँट्रो कार, सोन्याचे दागिने, तसेच कोयते, स्क्रू ड्रायव्हर, कटावणी असे घरफोडी साहित्य जप्त केले. हडपसर, मार्केट यार्ड, स्वारगेट आणि सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हे उघडकीस आणले असून, आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर कोथरूड-१, हडपसर-२, कोंढवा-२, डेक्कन-१ आणि चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये एक असे सात गुन्हे दाखल आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-५चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, विनोद शिवले, अकबर शेख, पृथ्वीराज पांडोळे, महेश वाघमारे, प्रमोद टिळेकर, विशाल भिलारे, प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, अजय गायकवाड, चेतन चव्हाण, आश्रुबा मोराळे, दत्ता ठोंबरे, अमर उगले, दीपक लांडगे, संजयकुमार दळवी, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
