तीन हजार 493 सार्वजनिक, तर 4 लाख 32 हजार 548 घरगुती गणेशमूर्तींचा समावेश
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला (रविवारी) गणरायाला शांततेत निरोप देण्यात आला. पुण्यात 3 हजार 493 सार्वजनिक, तर 4 लाख 32 हजार 548 घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देत सार्वजनिक गणपतीचे मंडपातच, तर घरगुती गणपतीचे कृत्रिम हौदात तसेच घरात विसर्जन करण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता यंदा पुण्यातील 3540 पैकी 3493 सार्वजनिक गणेश मंडळानी गणेशोत्सवात सहभाग घेतला होता, तर 47 सार्वजनिक मंडळांनी सहभाग घेतला नव्हता. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करत कोणतेही पारंपारिक कार्यक्रम न घेता, मिरवणुका न काढता जागेवरच विसर्जन करण्याच्या प्रशासनाने सूचना दिल्या होत्या. यंदाही नागरिकांनी सूचनांचे तंतोतंत पालन केले.
पुण्यातील पाच मानाचे गणपतीचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. त्यापैकी दगडूशेठ, भाऊ रंगारी आणि अखिल मंडई या गणपतींचे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विसर्जन करण्यात आले.
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच पोलिसांच्या वतीने विसर्जन मार्गावर बंदोबस्त न लावता शहराच्या मध्यवर्ती भाग आणि मंडळाच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. सार्वजनिक घाट आणि नदीपात्राच्या जवळ पोलिसांच्या वतीने पेट्रोलिंग करण्यात आले.
असा होता पोलीस बंदोबस्त
गणेशोत्सवादरम्यान पुण्यात तीन अप्पर पोलीस आयुक्त, दहा उपायुक्त,पंधरा सहाय्यक आयुक्त, 74 पोलीस निरिक्षक, 323 सहाय्यक व पोलीस निरिक्षक, 3 हजार 603 पोलीस कर्मचारी, 173 होमगार्ड आणि एक एसआरपीएफ कंपनी बंदोबस्तावर लावण्यात आली होती.
