सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : एकूण पावणेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील एकास अटक करण्यात सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून, विविध कंपन्याचे २२ महागडे मोबाईल व बुलेट मोटारसायकल असा ३,८२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात मोबाईल स्नॅचिंग व मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याने, सोलापूर जिल्ह्यात मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगाने माहिती घेऊन वरिष्ठांनी सदरच्या मोबाईल स्नॅचिंग व मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीस अटक करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस सबइन्स्पॅक्टर शैलेश खेडकर आणि पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्हे कोणी केले असतील, याबाबत माहिती काढली असता, पथकास गोपनीय बातमीदारामार्फत सदरचे गुन्हे टाकळी येथील एका इसमाने त्याच्या साथीदारासह केले असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने खात्री केली असता, बातमीप्रमाणे एक इसम चोरी गेलेले मोबाईल व बुलेट मोटारसायकल घेऊन टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) येथून सोलापूर शहर येथे मोबाईल विक्रीकरिता जात असल्याची खात्री झाली. त्या अनुषंगाने पथकाने वडकबाळ ( ता. दक्षिण सोलापूर) येथे सापळा लावून, बातमीतील वर्णनाच्या एका इसमास बुलेट मोटारसायकल व त्याचेकडील मोबाईलसह ताब्यात घेतले.
सदर इसमाच्या चौकशीतून त्याने साथीदारसह सदरचे मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातील बुलेट मोटारसायकलसुद्धा त्याने स्वतः सोलापूर शहरातून चोरी केल्याचे सांगितले आहे. सदर इसमाच्या ताब्यातील विविध कंपन्याचे २२ महागडे मोबाईल व बुलेट मोटारसायकल असा एकूण ३,८२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल पुढील तपासकामी ताब्यात घेतला आहे.
सदर गुन्ह्यांत सोलापूर ग्रामीण भागात चार गुन्हे, सोलापूर शहर भागात सात गुन्हे, असे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आले आहेत, तसेच गुन्ह्यातील अटक आरोपी हा पिंपरी पोलीस ठाणे येथील एका गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे. अटक आरोपीचे साथीदारावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध पोलीस ठाणेस गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, फौजदार श्रीकांत गायकवाड, पोलीस अंमलदार सलीम बागवान, दिलीप राऊत, हारिदास पांढरे, रवी माने, सचिन गायकवाड, पोलीस नाईक केशव पवार यांनी बजावली आहे.
