चंदननगर पोलिसांची कामगिरी : दोन लाखांचा टेम्पोही हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सिनेस्टाईल पाठलाग करून टेम्पो चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास शिताफीने पकडून बेड्या ठोकण्यास आणि चोरीस गेलेला दोन लाख रुपयांचा टेम्पो ताब्यात घेण्यात चंदननगर पोलिसांना यश मिळाले आहे.
चंदननगर पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला टाटा एस कंपनीचा चारचाकी टेम्पो आणि त्याच्या अज्ञात चोराचा तपास सुरू असताना गुरुवारी (२३ सप्टेंबर) तपासपथकातील अंमलदार अमित काबंळे, राहुल इंगळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामर्फत बातमी मिळाली की, चंदननगर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील असलेला सराईत राहुल छगन फडतरे (वय २३, रा. कानीफनाथ गड पायथा, वडकी गाव, ता. हवेली, पुणे) याने सदर टेम्पो चोरला असून तो आज कानीफनाथ गड पायथ्याजवळ त्याच्या राहत्या घरी येणार आहे.
सदरच्या बातमीबाबतची माहिती तपासपथकातील प्रभारी अधिकारी गजानन जाधव यांनी वरिष्ठांना कळवून त्यांच्या तोंडी आदेशाने बातमीच्या ठिकाणी रवाना होऊन त्या ठिकाणी सापळा रचून बसले असता काही वेळातच एक इसम तेथे दुचाकीवरून भरधाव वेगाने येताना दिसला. त्यावेळी त्यास पोलिसांची चाहुल लागताच तो तसाच भरधाव वगाने पुढे निघून जाऊ लागला, तेव्हा त्याचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास शिताफीने पकडून चंदननगर पोलीस स्टेशन येथे आणून अटक केले. त्यानंतर तो पोलीस कस्टडीत असताना त्याचेकडून निवेदन घेऊन त्याने टेम्पो लपवलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या ताब्यातून दोन लाख रुपये किमतीचा सदर टेम्पो हस्तगत करून दाखल गुन्ह्याचे पुराव्याकामी जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनील जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील थोपटे, सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, फौजदार युसुफ पठाण, हवालदार तुषार भिवरकर, पोलीस नाईक श्रीकांत शेंडे, पोलीस अंमलदार अमित कांबळे, राहुल इंगळे, सुभाष आव्हाड, नामदेव गडदरे, अतुल जाधव यांनी केलेली असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार बबन केदार हे करत आहेत.
